"अतिशय साध्या - सोप्या शब्दांमधून मुलांना आनंद देतं ते खरं बालसाहित्य" : रेणुताई गावस्कर
'मसाप' मध्ये शिरोळे बालसाहित्य पुरस्काराचे वितरण

पुणे : प्रत्येक आईबाबांना मुलांना गोष्ट सांगता यायलाच हवी, गोष्टींमधून तात्पर्य - शिकवण संस्कार देण्याचा अट्टहास नको तर आनंद देण्याघेण्याची ही गोष्ट असावी. अतिशय साध्या - सोप्या शब्दांमधून मुलांना आनंद देतं ते खरं बालसाहित्य असे मत ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कै. बाबुराव व कै. शांतादेवी शिरोळे स्मृतिप्रीत्यर्थ माया धुप्पड (जळगाव) आणि गोविंद गोडबोले (कोल्हापूर) यांना बालसाहित्यासाठीच्या योगदानाबद्दल गावस्कर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होत्या.
गावस्कर म्हणाल्या, " प्रत्येक मुलाची बुद्धीमत्ता आकलनक्षमता, आवड वेगवेगळी असते. त्यामुळे परीक्षेतल्या यश - अपयशानुसार मुलांशी आपली वागणूक ठरते. तसे न करता, "तू मला आवडतोस / आवडतेस' हा विश्वास आपल्या सहवासात बालकाला वाटत राहणं महत्वाचे आहे.
प्रा. जोशी म्हणाले, "मुलांमध्ये साहित्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मुलांच्या धावपळीच्या जीवनशैलीत खेळ आणि वाचनासाठी वेळ नाही ही चिंतेची बाब आहे. बालकुमारांसाठी लेखन करणाऱ्या लेखकांनी केवळ स्वतःच्या बालपणीचे अनुभव न मांडता आजच्या मुलांचे भावविश्व समजून घेऊन लेखन केले पाहिजे. तंत्रशरण झालेल्या पिढीला भावसंपन्न बनविण्यासाठी साहित्याची नितांत आवश्यकता आहे." गोडबोले म्हणाले, 'मुलांना बालपणी आपण चालायला - बोलायला शिकवतो तसं वाचायलाही शिकवायला हवं. फक्त पाठयपुस्तके नाही तर अवांतर वाचनाची आवड जोपासण्यासाठी घरात त्यांनी आपलं उदाहरण मुलांसमोर ठेवायला हवं. धुप्पड म्हणाल्या, 'रागावून छड्या न मारतं, मुलांना गप्प न करता, त्यांना बालसहज वृत्तीतून खेळू-बागडू द्यायला हवं. वाचन - श्रवण - दर्शन, अनुभवातून, रेडिओ, टी. व्ही. इनेटनेट अशा सगळ्या माध्यमातून मुलांची आकलनशक्ती, अभिरुची, संवेदनशीलता वाढते, जपता येते. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.