अण्णाभाऊंनी मराठी साहित्याचा केंद्रबिंदू हलविला : वि. दा. पिंगळे

पुणे : लोकशाहीर, साहित्यिक, गायक, नाटककार कम्युनिष्ट पक्षाचे कार्यकर्ते वक्ते आण्णाभाऊ यांनी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव सारख्या छोट्या गावातील उपेक्षित, दुर्लक्षित मातंगवस्तीतून आणाभाऊंचा, खडतर प्रवास सुरु झाला. दिड दिवस शाळेत जाण्याचे भाग्य लाभले. मुंबई नगरीत आल्यानंतर त्यांचातला कलावंत, लेखक, कार्यकर्ता घडला. दुकानावरच्या पाट्या वाचून आणि सिनेमाची पोस्टर लावता लावता शब्दांची ओळख झाली आणि आण्णाभाऊ साठे साक्षर झाले. आपल्या शाहिरीतून आणि लेखनांतून दलित, कामगार माणसांची जीवन व्यथा समाजासमोर प्रखरपणे मांडली. आणभाऊंचा प्रत्येक शब्द हा मानव मुक्तीसाठी आणि परिवर्तनासाठी होता. आण्णाभाऊंच्या कथा, कादंबऱ्यामुळे मराठी साहित्यात नवे विषय, आशय, नवे संघर्ष आणून सोडले. आण्णाभाऊंनी मराठी साहित्याचा केंद्रबिंदू हलविला असे मत वि. दा. पिंगळे यांनी व्यक्त केले. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि दलित साहित्य परिषद यांच्या सयुंक विद्यमाने आयोजित आण्णाभाऊ साठे स्मृतिव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर, धर्मराज निमसरकर उपस्थित होते.
पिंगळे म्हणाले, 'साहित्यापासून खूप दूर असलेली माणसं त्यांचे जगणं, संघर्ष, प्रथमतः अण्णाभाऊंनी साहित्यात आणला. साहित्याचा केंद्रबिंदू जो शहरी, मध्यमवर्गीय सदाशिवपेठी जगात रमलेला, अडकलेला होता, तो हलला आणि गावकुसाबाहेरील दलित, उपेक्षित, झोपडपट्टी, आदिवासी वर्गाकडे सरकला. आपल्या संघर्षाचा जाहीरनामा मराठी साहित्यापुढे मांडला. आण्णाभाऊंचे साहित्य हे मानवता स्वातंत्र्य, समता, चारित्र्य, प्रस्तापित करण्यासाठी आहे. माणसाला माणसासारखे जगू द्या हा संदेश देणारे आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याने मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. अण्णाभाऊंनी कथा, कादंबरी, लोकनाट्य, लावण्या जसे विपुल लेखन केले. लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ग्रामीण भागात पोहोचवली. खेड्या-पाड्यातील असंख्य लोकांना या चळवळीशी जोडून घेतले. आण्णाभाऊंचे आयुष्य म्हणजेच एक चळवळ होती. कधीही कुणाचा द्वेष, मत्सर केला नाही तर सगळं आयुष्य चळवळीसाठी साहित्यासाठी अर्पण केले.
आण्णाभाऊंचा अखेरचा कालखंड अतिशय हलाखीचा गेला. चिरागनगरीच्या झोपडीत स्वतःच्या साहित्याचा चिराग तेवत ठेवत आण्णाभाऊ लिहीत राहिले. पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे हे तत्वज्ञान अण्णांनी जगासमोर मांडले. मराठी साहित्याची बाग समृद्ध करून १८ जुलै १९६९रोजी आण्णाभाऊंची जीवनज्योत मालवली.
सुनीताराजे पवार म्हणाल्या, ' वाटेगाव सारख्या छोट्या गावातून पायी मुबंईला चालत जाऊन आण्णाभाऊंनी आपले आयुष्य कष्ट आणि हलाखीच्या परिस्थितीत काढले. कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य, असे साहित्य प्रकार आपल्या लेखणीनीतून त्यांनी मांडले. सर्व सामान्य माणसाचे जगण्याचे प्रश्न, लोकांच्या व्यथा, वेदना आण्णाभाऊंनी आपल्या कथा कादंबऱ्यांतून जगासमोर आणले.
दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.