मसाप ब्लॉग  

शब्द थांबतात, तेव्हा चित्रे बोलू लागतात : शि. द. फडणीस

July 25, 2017

मसाप गप्पा :शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्रांचा अनोखा आविष्कार 

पुणे : वयाच्या ९२ व्या वर्षीही सफाईदारपणे, लयबद्ध रीतीने फिरणारा हात ... कुंचल्यातून होणारा व्यंगचित्रांचा अनोखा आविष्कार... व्यंगचित्रांच्या दुनियेतील गमतीजमती सांगताना येणारी मिस्कील स्वभावाची प्रचिती ... ब्रशमध्येही शोधून काढलेला मानवी कंगोरा, असे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या स्वभावाचे नानाविध पैलू प्रेक्षकांनी सोमवारी अनुभवले.  महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'मसाप गप्पा' या उपक्रमांतर्गत फडणीस यांची चारुहास पंडित यांनी घेतलेली मुलाखत आणि कुंचल्यांच्या फटकाऱ्यातून सादर झालेले प्रात्यक्षिक उत्तरोत्तर रंगत गेले. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे, कार्यवाह माधव राजगुरू, दीपक करंदीकर उपस्थित होते. 

      'शब्द थांबतात तेव्हा चित्रे बोलू लागतात, चित्रांना त्रिमिती मिळाली की शिल्प साकारते, शिल्पामध्ये चैतन्य निर्माण झाले की नृत्य जन्मते आणि नृत्याला सूर गवसले की संगीत निर्माण होते', अशा मार्मिक शब्दांमध्ये शि. द. फडणीस यांनी जणू कलेचा प्रवासच कथन केला आणि कलेच्या प्रांतातील भिंती डोक्यातून काढून टाका, असा मौलिक सल्लाही दिला. 
      फडणीस म्हणाले, 'लहानपणापासून चित्रे काढण्याचा छंद होता मात्र चित्रकार व्हायचे असे ठरवले नव्हते. मी आणि वसंत सरवटेंनी एकत्र चित्रकलेच्या परीक्षा दिल्या. ग्रेड परीक्षेत तीन पारितोषिके मिळाल्यानंतर तुला चित्रकला कळते, असे शिक्षकांनी सांगितले. 'रेघोट्या मारून काय मिळणार' असे लोक विचारायचे. चुकलेले चित्र म्हणजे व्यंगचित्र अशी क्रूर कल्पना त्या काळात रूढ होती. 
     राजकीय टीकाचित्र म्हणजे व्यंगचित्र नव्हे. व्यापक अवकाशाची ती एक शाखा आहे. कालांतराने ती विकसित होत गेली, असे सांगतानाच फडणीस म्हणाले, 'चित्रांची भाषा समजली की ती कशी वापरायची तेही आपोआप कळू लागते.'  वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. 


चित्र चितारताना... 
शि. द. फडणीस यांनी घनदाट केसांची स्त्री आणि केवळ चार केस असणारा पुरुष यांचे बेरीज - वजाबाकीमध्ये काढलेले व्यंगचित्र, कपबशीची व्यथा, ब्रश मला कसा दिसला अशा विविध व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिक सादर केले. ते म्हणाले,'चित्र नुसते पाहण्यात गंमत नसते, तर ते चितारताना पाहण्यात गंमत असते. चित्रकार व्यंगचित्रांची भाषा कशी वापरतो, रेषांमधील मजा काय असते, हे माध्यम कसे वापरायचे, हे सर्व प्रात्यक्षिकांमधून दाखवता येते.'व्यंगचित्रातून सोडवलेले गणित, व्यंगचित्रांचे कॉपीराईट, अशा विविध विषयांवर संवाद साधला. 

 

 

 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive