अभिवाचनांतून उलगडला पु. शि. रेगेंच्या साहित्याचा 'सृजनरंग'
'तू हवीस यात न पाप
तू हवीस यात समर्थन
तू हवि असताना
पण हवि असताना
कशास तू ? का तू ? तूच का ? छे छे माझि न तू यातच पाप

अशा एकाहून एक ज्येष्ठ साहित्यिक पु. शि. रेगे यांच्या सरस प्रेमकविता सादर करीत आणि लघुकथांचे अभिवाचन करीत महाराष्ट्र साहित्य परिषदेत 'सृजनरंग' हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या ज्येष्ठ साहित्यिक पु. शि. रेगे यांच्या साहित्याच्या अभिवाचनाचे. 'सृजनरंग' या कार्यक्रमाची निर्मिती महाराष्ट्र कल्चरल सेंटरने केली होती. कार्यक्रमाची संकल्पना दिग्दर्शन, संकलन आणि संगीत प्रमोद काळे यांचे होते. या कार्मक्रमात हर्षद राजपाठक, वेदांत रानडे, ओमश्री बडगुजर, अमृता पटवर्धन आणि सचिन जोशी यांनी सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, महाराष्ट्र कल्चरल सेन्टरचे प्रमोद काळे उपस्थित होते. यावेळी फुलोरा, हिमसेक, दोला, गंधरेखा, पुष्कळा, दुसरा पक्षी, स्वानंद बोध, प्रियाळ, सुहृदगाथा, मरणोत्तर या कविता संग्रहातील कवितांचे आणि रूपकथ्यक तसेच मनवा या कथासंग्रहातील लघुकथांचे वाचन ऐकताना साहित्यातून जीवनाच्या उत्सुकतेचे उत्कट दर्शन घडविणारे पु. शि. रेगे यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व रसिकांसमोर उभे राहिले.

यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'पु. शि. रेगे हे मर्ढेकरांचे समकालीन असले तरी दोघांचीही काव्यप्रकृती भिन्न होती ज्यावेळी मर्ढेकर आपल्या काव्यातून मानवी संबंधातील परात्मता, मानवी मूल्यांच्या आणि सौंदर्याच्या कोसळणीचे दर्शन घडवीत होते. त्यावेळी रेगे त्यांच्या कवितेत जीवनोत्सुकतेचे उत्कट दर्शन घडवीत होते. कारण त्यांची वाङ्मयाकडे आणि जीवनाकडे पाहण्याची भूमिका वेगळी होती. रेगेंची कथा गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले या समकालीन नवकथेच्या प्रवाहापासून पूर्णतः अलिप्त होती. भारतीय साहित्य परंपरेतील 'वृत्तक' या कथाप्रकाराशी नाते सांगणारी कथा त्यांनी लिहीली. आटोपशीर संवाद, मितभाषी शैली आणि वेल्हाळ कथनपद्धती ही रेगेंच्या कथांची वैशिट्ये होती. पु. शि. रेगे तत्कालीनते मध्ये रमले नाहीत स्त्रीशक्ती ही सर्जनशक्ती आहे त्यामुळे प्रेमभाव, सौन्दर्यभाव व कामभाव हा सर्व या सर्जनशक्तीचा विलास आहे. अशी त्यांची धारणा होती. स्त्रीच्या आदिप्रतिमेचा विविधांगी प्रत्यय त्यांच्या कवितेतून वाचकांना मिळतो. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.