top of page

मसाप ब्लॉग  

मुलांसाठी वेळ द्या, संवाद साधा आणि अपयशातही पाठराखण करा

साहित्य परिषदेतील परिसंवादात मान्यवरांचे मत

पुणे : कोवळ्या मुलांच्या आत्महत्या हा सामाजिक कलंक आहे. मुलांना केवळ भौतिक सुविधा देऊन पालकांची जबाबदारी संपत नाही. मुलांसाठी वेळ द्या, संवाद साधा आणि अपयशातही पाठराखण करा, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, शब्दांगण आणि रोहन प्रकाशन यांच्या वतीने आयोजित शोध अस्वस्थतेचा : मुलांच्या आत्महत्येचा या विषयावरील परिसंवादात लेखक राजीव तांबे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संज्योत देशपांडे, संगणकतज्ज्ञ अतुल कहाते, डॉ. वर्षा तोडमल सहभागी झाले होते. अध्यक्ष स्थानी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. यावेळी मसापच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, शब्दांगणचे लक्ष्मण राठीवडेकर, रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाठकर उपस्थित होते.

राजीव तांबे म्हणाले, पालकांनी मुलांच्या यशाप्रमाणे उपयशातही सहभागी झाले पाहिजे. त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, मुलांमध्ये तुलना करणे थांबविले पाहिजे.

अतुल कहाते म्हणाले, मुलांना गरज असते तेव्हा पालकांना वेळ नसतो, वेळ असतो तेव्हा इच्छा नसते त्यामुळे मुलांची संवादाची भूक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भागविली जाते, हे चिंताजनक आहे. तंत्रज्ञान किती वापरायचे याचा विवेक मुलांना शिकविला पाहिजे.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, स्पर्धा तसेच पालकांकडून प्रेम आणि अपेक्षांचा कडेलोट झाल्यामुळे मुलांच्या मनावर अनेक ताण आहेत. मुलांना केवळ भौतिक सुविधा देऊन पालकांची जबाबदारी संपत नाही, गरज आहे ती भावनिक संवाद साधण्याची, त्यांचे एकटेपण दूर करण्याची, कोवळ्या मुलांच्या आत्महत्या हा सामाजिक कलंक आहे. मोबाइलपेक्षा मुले पुस्तकाशी मैत्री करतील याकडे लक्ष दिले पाहिजे.

डॉ. संज्योत देशपांडे म्हणाल्या, आत्महत्या करणाऱ्या मुलांना मरायचे नसते तर त्यांना होणारी असह्य मानसिक वेदना कमी करायची असते. अशी मुले संदेश देत असतात त्याकडे पालकांनी गांभीर्याने पाहून त्यांच्याशी मोकळा संवाद केला पाहिजे.

वर्षा तोडमल म्हणाल्या, गांगरलेली मुले आणि गोंधळलेले पालक अशी परिस्थिती आहे. आई -वडिलांमधला विसंवाद आजाराइतकाच गंभीर आहे.

सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण राठीवडेकर यांनी सूत्रसंचालन केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon