मसाप ब्लॉग  

माणूस आहे तोवर कथा असणारच : डॉ. छाया महाजन

August 11, 2017

 

साहित्य परिषदेत रंगला कथा-सुगंध कार्यक्रम 

 

पुणे : सगळ्या क्षेत्रात उलथा पालथ होणारे समाजिक, राजकीय, धार्मिक, पर्यावरणीय जीवन आहे. नवनवीन शोधांनी, विचार मंथनातून समाज जीवनात परिवर्तन होतेय. या सगळ्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज लेखकाला असावी लागते. उर्मीबरोबरच समाजाबद्दल, व्यक्तीबद्दल, समुहाबद्दल संवेदनशील असले पाहिजे. कारण मानवी जीवनात घटना आहेत. साहित्याचे मूळ स्वरूप हे करुणा आणि वेदना आहे. अलीकडचे ग्रामीण, दलित किंवा स्त्रीवादी साहित्य ही उदाहरणे आहेत. नवीन येऊ घातलेले तृतीयपंथी किंवा ट्रान्सजेंडरवरचे साहित्यसुद्धा हेच दाखवील. कथा ही अनंत काळ चालत राहणार. माणूस आहे तोवर, असे मत प्रसिद्ध कथा लेखिका छाया महाजन यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कथा-सुगंध या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. महाजन यांच्या कथांचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेन्टरचे सौदामिनी साने आणि हर्षद राजपाठक यांनी केले. 

महाजन म्हणाल्या, वास्तविक गोष्ट ऐकणे हे प्राचीन काळापासून सुरु आहे. कोणत्याही भाषेत वाङ्मय हे कथात्मक आहे. दृष्टांत, आख्यान, रामायण, महाभारत, दृष्टान्तपाठ, बखरी शाहीर कवने या सगळ्यात कथा आहेच. 

मी इंग्रजी साहित्याची विद्यार्थिनी होते. वाचनाचे खूप वेड होते. उत्तमोत्तम साहित्य वाचनात आले. वाचनाने कक्षा रुंदावतात आणि वेगवेगळ्या देशातील, धर्मातील, जातीतील माणसांशी संपर्क झाल्यामुळेही त्या दृष्टीने ब्रिटनमधले ४ वर्षांचे वास्तव्य मला खूप पुरक ठरले. 

लेखनाबाबत, प्रेरणांबाबत खूप प्रश्न विचारले जातात. उर्मी ही आंतरिक प्रेरणा आहे. त्यासोबत क्षमतेचा भाग येतो आणि मुख्य म्हणजे उत्सुकता आणि निरीक्षणही अत्यावश्यक आहे. बाह्य प्रेरणांचाही स्रोत असतोच. आपले कुटंब, प्रभावशाली व्यक्ती, मानवी प्रवृत्ती व मानसिक उलथापालथ, सामाजिक वास्तव, वैचारिक बांधिलकी, वैश्वीक जागरूकता ह्या प्रेरणादायी असतात पण ते लेखकाला भिडले पाहिजे, जाणवले पाहिजे, त्यातून काय ध्वनित करायचे तेही आपोआप होते. 

मी जवळजवळ शंभरावर लघुतम कथा लिहिल्यात. हा आकृतीबंध हाताळणारी मी पहिली लेखिका होते. नकळत या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला. सघन शब्दरचना, अगदी थोडक्या शब्दात कवितेइतकी किंवा त्याहून थोडी मोठी कथा पण प्रचंड परिणामकारक आणि भाष्य करणारी असते. एखादे पात्र किंवा घटना त्यासोबतचे वास्तव हे यांचे वैशिष्ट्य. ह्या कथा माझ्याकडे आल्या. नुक्कड कथा हे अभिनव नाव याला दिलेय. 

कादंबरी, ललीत, गद्य, बालसाहित्य, भाषांतर, चरित्र अनुवाद हे आकृतिबंध मी हाताळले आहेत पण कथालेखनाचा एक सबळ, सशक्त धागा मला सोडवत नाही. एखादी घटना, व्यक्ती त्याच्या सभोवतालासह वाचकाबरोबर भुरळ घालते, वाचक ते गारुड फेकू शकत नाही.  कथा ही पूर्ण कलाकृती आहे म्हणून तर आज कथाकार विसरले जात नाहीत. उलट कथांचे चित्रपटात रूपांतर हे माध्यमांतर सुरु आहेच. प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. वि. दा. पिंगळे यांनी आभार मानले.  सुनीताराजे पवार यांनी आभार मानले. 

 

 

 

 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive