top of page

मसाप ब्लॉग  

खंडाळ्याच्या शिवारात रंगले मसापचे पहिले शिवार साहित्य संमेलन

चोहीकडे हिरवेगार डोंगर, उंच नारळाची गर्द झाडी, उसाची हिरवीगार शेती, पक्ष्यांचे मंजुळ आवाज, जनावरांचे हंबरण्याचे आवाज आणि त्यांच्या गळ्यातील वाजणाऱ्या घंटा, ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट अशा प्रसन्न वातावरणात गावातले शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांनी साहित्याचा आस्वाद घेतला. ना मंडप, ना भपका, ना कुण्या पुढाऱ्यांचा बढेजाव, ना सत्कार सोहळ्याचे कौतुक, ना रुसवे फुगवे बळीराजाच्या आणि काळ्या आईच्या सहवासात माती, नाती आणि संस्कृतीचा जागर करीत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इतिहासातील पहिले शिवार साहित्य संमेलन अजनुज (ता. खंडाळा, जि. सातारा) या गावातील शिवारात रंगले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा खंडाळा आणि ज्ञानदीप क्रेडिट को-ऑप सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वनाथ पवार यांच्या शिवारात या साहित्य संमेलनाचे आयोजन प्रसिद्ध ग्रामीण कथाकार आणि कथाकथनकार रवींद्र कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी संमेलनाचे उदघाटक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, खंडाळा शाखेचे अध्यक्ष विलास वरे, लेखक शंकर कवळे, जिजाबा पवार उपस्थित होते. उदघाटन सत्रानंतर कविसंमेलन, कथाकथन असे कार्यक्रम झाले.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, केवळ महानगरापुरती मर्यादित न राहता साहित्य परिषद ग्रामीण भागापर्यंत शिवरापर्यंत पोचते आहे ही समाधानाची बाब आहे. साहित्य रसिकांना संमेलनापर्यंत पोचणे शक्य नसेल तर संमेलनांनी त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे. कारखानदार त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूची किमंत ठरवितात, बिल्डर त्यांनी बांधलेल्या घरांच्या किंमती ठरवितात. अन्नधान्य निर्माण करणारे शेतकरी मात्र त्यांच्या मालाची किंमत ठरवू शकत नाहीत. ही या देशाची शोकांतिका आहे. 'बळीराजा' असे गोंडस नाव देऊन शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे हे दुर्दैवी आहे. पुढील शिवार साहित्य संमेलन दुष्काळी भागात होईल.

रवींद्र कोकरे म्हणाले, जोपर्यंत शिवारातली माणसं लिहीत आहेत, साहित्याचा आनंद घेत आहेत तोपर्यंत भाषेची आणि साहित्याची काळजी करण्याची गरज नाही. शिवारातल्या माणसांनीच आजवर मराठी भाषा टिकवली आहे.

अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या संमेलनाची सांगता पिठलं - बाजरीची भाकरी, जवसाची चटणी, वरण - भात आणि शिरा असा फक्कड मराठमोळा बेत असलेल्या भोजनाने झाली. ज्यांचा धडा पाठयपुस्तकात असूनही ज्यांना पोटासाठी गवंडी काम करावे लागते असे कराडचे कादंबरीकार शंकर कवळे यांचा सत्कार सर्वांनाच सदगदित करून गेला.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page