top of page

मसाप ब्लॉग  

'मसाप'च्या पुरस्कार निवडीत आता वाचकांचाही सहभाग

कार्यकारी मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; निवड पारदर्शी करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार श्रेष्ठता पुरस्काराच्या निवडीत आता वाचकही सहभागी होणार आहेत. साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, पुरस्कार निवडीसाठी असा निर्णय घेणारी 'मसाप' ही महाराष्ट्रातील पहिली साहित्य संस्था ठरली आहे. अशी माहिती साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. परिषदेच्या कार्यकारी मंडळाची सभा परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांच्यासह ३२ सदस्य उपस्थित होते. या सभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.


प्रा. जोशी म्हणाले, "मसापच्या वतीने प्रतिवर्षी चाळीस ग्रंथ आणि ग्रंथकारांना श्रेष्ठता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मसाप जीवनगौरव, भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार आणि ग्रंथकार पुरस्काराची निवड पदाधिकारी समिती करते. ग्रंथ पुरस्कारासाठी निवेदन देऊन ग्रंथ मागविले जातात. प्रत्येक वाड्मयप्रकारासाठी दोन तज्ज्ञ परीक्षक नेमले जातात. अनेक चांगली पुस्तके प्रकाशकांना आणि लेखकांना माहिती न मिळाल्यामुळे तसेच अनास्थेमुळे परिषदेकडे पाठवली जात नाहीत. चोखंदळ वाचकांनी चांगली पुस्तके वाचलेली असतात. ते अशा पुस्तकांची शिफारस परिषदेकडे या निर्णयामुळे करू शकतील आणि वाचकांनी सुचविलेल्या पुस्तकांचाही विचार करणे परीक्षकांसाठी बंधनकारक राहिल. तसेच मसाप जीवनगौरव आणि भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारासाठी वाचकांना नावे सुचविता येतील. पुरस्कार निवडीची प्रक्रिया पारदर्शी व्हावी हा त्यामागचा हेतू आहे. परिषदेच्या आजवरच्या वाटचालीतला हा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे.


मसापची १३ जिल्ह्यात होणार दरवर्षी बालकुमार साहित्य संमेलने


बालकुमारांसाठीचे साहित्य संमेलन गेल्या तीन-चार वर्षात होऊ शकले नाही. ज्यांच्या खांद्यावर उद्याच्या वाचनसंस्कृतीची पालखी आहे, ती मुले साहित्यापासून वंचित राहून चालणार नाही, यासाठी साहित्य परिषदेने मसापचे कार्यक्षेत्र असलेल्या १३ जिल्ह्यांमध्ये तेथील स्थानिक मसाप शाखा आणि शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने साधेपणाने बालकुमार साहित्य संमेलने घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोणाशीही स्पर्धा करण्यासाठी घेतलेला नसून बालकुमारांसाठीची साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी घेतला आहे, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले. या निर्णयामुळे प्रतिवर्षी प्रत्येक जिल्ह्यात संमेलन होईल.


ग्रंथालयाच्या डिजिटायझेशनसाठी कार्यकारिणीचा पुढाकार


मसापच्या वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनसाठी परिषदेने 'ग्रंथ दत्तक योजने'चा प्रारंभ केला. या उपक्रमाची सुरुवात कार्यकारी मंडळातील सदस्य एका ग्रंथाचा डिजिटायझेशनचा खर्च उचलून करणार आहेत. तर कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष हे तीन पदाधिकारी प्रत्येक दहा ग्रंथाच्या डिजिटायझेशनचा खर्च उचलणार आहेत, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.


प्रत्येक जिल्ह्यात होणार शिवार साहित्य संमेलन


अजनुज (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे मसापने पहिले शिवार साहित्य संमेलन घेतले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आता हाच प्रयोग मसापचे कार्यक्षेत्र असणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये केला जाणार आहे. साधेपणाने, कमी खर्चात होणारी अशा प्रकारची संमेलने तळागाळातील साहित्यप्रेमींना जोडण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.



Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page