विंदांच्या साहित्यात जीवनदृष्टी आणि कलादृष्टीचा समन्वय

दिलीप करंबळेकर : साहित्य परिषदेत विंदांना अभिवादन
विंदांच्या साहित्यात जीवनदृष्टी आणि कलादृष्टी यांचा सुरेख समन्वय आहे, असे मत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतील शाहीर अमरशेख अध्यासनाचे प्रमुख प्रा. प्रकाश खांडगे, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते.
करंबळेकर म्हणाले, 'विंदांनी जुन्या वाङ्मय प्रकारांचा आधुनिक दृष्टीने वापर करून साहित्य निर्मिती केली. त्यातून त्यांच्या प्रयोगशीलतेचे दर्शन घडते.'
डॉ. ढेरे म्हणाल्या , 'विंदांच्या लेखनाने मराठी साहित्य क्षेत्राची समृद्धी आणि उंची वाढवली. त्यांच्या कविता आणि मुख्यतः प्रयोगशीलता त्यांचं विश्वभान, त्यांची एकूणच वाङ्मयीन दृष्टी यांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचविणारे कार्यक्रम या निमित्ताने परिषदेतर्फे व्हावेत. परिषदेने विंदांच्या साहित्याचा जागर करण्याचा निर्णय जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने घेतला आहे आणि मसापच्या सर्व शाखा यात सहभागी होत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. एक महत्वाची वाङ्मयीन संस्था म्हणून केवळ उत्सवी समारंभ न करता वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन व्हावे ही परिषदेने आपली जबाबदारी मानली पाहिजे.'
प्रा. जोशी म्हणाले, 'तत्वचिंतनाला काव्याच्या पातळीवरून व्यक्त करण्याचे असाधारण सामर्थ्य हा केशवसुत -मर्ढेकर-विंदा यांना जोडणारा एक प्रमुख दुवा आहे. मर्ढेकरी परंपरेत लिहिणाऱ्या कवींमध्ये करंदीकरांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. आपल्या कठोर काव्यनिष्ठेने महायुद्धानंतर मराठी कवितेतील आशय अभिव्यक्तीच्या क्षेत्रमर्यादा करंदीकरांनी जाणीवपूर्वक आणि कलात्मक अपरिहार्यतेचा संबंध न विसरता विस्तृत केल्या. करंदीकरांची चिंतनशील कविता विश्वसत्याचे दर्शन घेण्याच्या ध्यासातून निर्माण झाली. विंदांच्या जन्मशताब्दी निमित्त मसापतर्फे तेरा जिल्ह्यात त्यांच्या साहित्याचा जागर केला जाणार आहे.'