मसाप ब्लॉग  

पुस्तकांचे पंख लावून उंच भरारी घ्या : डॉ. अरुणा ढेरे

मसापच्या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात हुजूरपागा प्रशालेत रंगला संवाद


पुणे : तुमच्या संवेदना जाग्या ठेवा, डोळसपणे जगाकडे पहा. खूप वाचा. विचार करा. आयुष्याला सुंदर करणाऱ्या खूप गोष्टी तुमच्या हाती लागतील, त्यासाठी पुस्तकांचे पंख लावून उंच भरारी घ्या, असा सल्ला प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी विद्यार्थिनींना दिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात हुजूरपागा प्रशालेतील विद्यार्थिनींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा झोडगे, उपमुख्यध्यापिका मंगला वाघमोडे, हेमा भूमकर उपस्थित होत्या. यावेळी कविता सुचते कशी ? तुमचे कोणते पुस्तक तुम्हाला आवडते ? कविता कवीची कोण लागते ? असे अनेक प्रश्न मुलींनी डॉ. ढेरेंना विचारले. त्याची त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.


डॉ. ढेरे म्हणाल्या, मला कविता अगदी लहान वयातच भेटली. याच शाळेत मी शिकले आणि इथल्या शिक्षकांनी मला लेखनासाठी खूप उत्तेजन दिले. मी शाळेत असताना, मी लिहिलेल्या कविता इथल्या फलकावर प्रथम प्रसिद्ध झाल्या. आज मला साहित्यक्षेत्रातील कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार मिळाले पण त्यावेळी ५ रुपयांचे बक्षीस देऊन बाईंनी दिलेली शाबासकी हा मला सर्वात मोठा पुरस्कार वाटतो. कविता ही जिवलग मैत्रिणीसारखी असते. आपण तिच्याशी मोकळेपणाने बोलू शकतो. चांगल्या कवितेचा जन्म अस्वस्थतेतूनच होतो. कवी होण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनी दुसऱ्या कवींच्या उत्तम कविता प्रथम वाचल्या पाहिजेत.


प्रा. जोशी म्हणाले, आयुष्याच्या सीइटी मध्ये यशस्वी होण्यासाठी साहित्य नक्कीच तुम्हाला भावनिक बळ देईल. व्यक्तिमत्त्व भावसंपन्न करणाऱ्या साहित्याशी मैत्री करा. मनीषा राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


आणि डॉ. ढेरे भारावल्या . . .

हुजूरपागा प्रशालेत डॉ. अरुणा ढेरे यांनी अकरावी पर्यंतचे शिक्षण घेतले. डॉ. ढेरे शाळेत शिकत असताना त्यांचे कविता सादर करत असतानाचे, भाषण करतानाचे आणि पुरस्कार स्वीकारतानाचे फोटो संकलित केलेली एक सुरेख फ्रेम प्रशालेतर्फे त्यांना भेट देण्यात आली. त्यामुळे या कार्यक्रमात त्या जुन्या आठवणींनी त्या भावुक झाल्या. शाळेत आले आणि मला आठवणींची जुनी सोनेरी पिसे मिळाली, असे त्या म्हणाल्या.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon