'मसाप'चे पहिले बालकुमार साहित्य संमेलन लोणावळ्याला
अध्यक्षपदी डॉ. अनिल अवचट; २० सप्टेंबरला होणार संमेलन

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे लोणावळा येथे आयोजन करण्यात आले आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षस्थान बालकुमारांसाठीच्या लेखनाबद्दल साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट भूषविणार आहेत. या संमेलनाला परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि मसापचे पदाधिकारी तसेच मनशक्ती प्रयोग केंद्राचे विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद बापर्डेकर, संशोधन विभागप्रमुख व विश्वस्त गजानन केळकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले, "या पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ शोभायात्रा आणि ग्रंथदिंडीने होणार असून त्यात शाळातील सातशे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मराठी अभिमान गीत शालेय विद्यार्थी सादर करणार असून उदघाटन सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट बालकुमारांशी संवाद साधणार आहेत. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या बालकवितांवर आधारित विशेष कार्यक्रम लेखक राजीव तांबे सादर करणार आहेत. भोजनानंतरच्या सत्रात कवयित्री डॉ. संगीता बर्वे, आश्लेषा महाजन आणि आदित्य दवणे 'लेखनाची आनंद वाट' या कार्यक्रमात बालकुमारांसाठी लेखन कार्यशाळा घेणार आहेत. 'आम्हालाही काही सांगायचंय' या विशेष कार्यक्रमात अनेक बालकुमार त्यांनी लिहिलेल्या कथा, कविता आणि लेखांचे सादरीकरण करणार आहेत. समारोपाला पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून ते बालकुमारांशी संवाद साधणार आहेत. संमेलनात सहभागी होणाऱ्या सर्व बालकुमारांना मानशक्तीचा 'पंख मनांचे रंग क्षणांचे' हा दिवाळी अंक भेट दिला जाणार आहे. जोशी म्हणाले, "उद्याच्या साहित्य संस्कृतीची पालखी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा बालकुमारांसाठीची साहित्य संमेलने बंद पडली आहेत. ही मुले साहित्य आणि संमेलनाच्या आनंदापासून वंचित राहू नयेत यासाठी जिल्हावार साधेपणाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलने घेण्याचा निर्णय मसापच्या कार्यकारिणीने घेतला. त्यानुसार मसापचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये ही संमेलने होणार आहेत. या पहिल्या संमेलनासाठी मसापच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोणावळ्याच्या मनःशक्ती प्रयोग केंद्राने पुढाकार घेतला याचा आनंद आहे.