'मर्ढे व्हावे कवितेचे गाव आणि वाङ्मयीन पर्यटनस्थळ'
साहित्य परिषदेच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद
पुणे : आधुनिक मराठी कवितेचे जनक आणि युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांचे मूळगांव असलेल्या मर्ढे (जि. सातारा) या गावाला कवितेचे गाव म्हणून विकसित करताना तिथे गेल्या सातशे वर्षातली प्रातिनिधिक मराठी कविता कवींच्या परिचयासह कोरली जावी आणि या गावाला वाड्मयीन पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाकडे पाठविला आहे. हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रयत्नांना आलेले यश आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्रा. जोशी म्हणाले, 'महाबळेश्वर येथे १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मर्ढे हे गाव कवितेचे गाव म्हणून विकसित करावे आणि त्याला वाङ्मयीन पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा असा ठराव सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ, विनोद कुलकर्णी आणि सोपानराव चव्हाण यांनी मांडला होता त्याला कार्यकारी मंडळाने एकमताने मंजुरी दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यासाठी साहित्य परिषदेच्या शिष्ट मंडळाने पाचगणी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्या बरोबरच युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या सातारा जिल्ह्यातील मर्ढे या मूळ गावाला कवितेचे गाव म्हणून विकसित करताना तिथे गेल्या सातशे वर्षातील प्रातिनिधिक कविता कवींच्या परिचयासह कोरली जावी आणि या गावाला वाड्मयीन पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे अशी मागणीही केली होती. त्याला सकारत्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाकडे पाठविला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे. (संदर्भ - २५५८६९२/२०१७/cmo (TAPAL) साहित्य परिषदेच्या प्रयत्नांना आलेले हे यश आहे. मर्ढे गाव वाङ्मयीन पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाल्यास या गावाच्या विकासाला चालना मिळेल. अशी सातारकरांची भावना आहे.

मर्ढेकरांचे स्मारक उदघाटनाच्या प्रतिक्षेत १९६३ साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला झाले. या संमेलनात सातारा जिल्ह्यातील मर्ढे या बा. सी. मर्ढेकरांच्या मूळगावी त्यांचे स्मारक व्हावे अशी भावना सारस्वतांनी व्यक्त केली. सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अभयसिहंराजे भोसले माजी आमदार कांताताई नलावडे यांनी या कामाला गती दिली. मध्यंतरी निधीअभावी रखडलेले काम माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मार्गी लागले. या स्मारकासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा जिल्ह्यातील शाखांनी आणि रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी यांनी सातत्याने पाठ पुरावा केला. ३७ लाख रुपये खर्च करून तयार झालेले मर्ढेकरांचे स्मारक उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे.