लिहणं हे स्वत:शी बोलंणंच असतं - डॉ. अनिल अवचट
धुंवाधार पावसात रंगला लोणावळ्यात साहित्याचा उत्सव, बालकुमार साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन
बाहेर कोसळणारा धुंवाधार पाऊस, सभोवतीचा हिरवागार निसर्ग, आपल्या लयीत कोसळणारे सुंदर धबधबे आणि सभागृहात कोसळणारा शब्दांचा पाऊस. अशा मनोहारी वातावरणात मनशक्ती प्रयोग केंद्राच्या परिसरात बालकुमारांनी हशा आणि टाळ्यांच्या साथीने साहित्याचा मनमुराद आनंद लुटला. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोणावळ्यातील पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे. संमेलनाच्या प्रारंभी मुलांनी लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात काढलेली ग्रंथदिंडी आणि सादर केलेले मराठी अभिमान गीत यामुळे निर्माण झालेल्या वेगळ्या माहोलात कधी गोष्टी सांगत, तर कधी ओरीगामी करत कागदांचा उडणारा पक्षी दाखवत, तर कधी दोर्यांची गंमत दाखवत,कधी रुमालाच्या साहाय्याने अनेक वस्तू तयार करण्याची करामत दाखवत, तर कधी कविता आणि गाणी म्हणत डॉ.अनिल अवचट यांनी मुलांशी एकरुप होत थेट संवाद साधला आणि या संवादात मुलेही रमून गेली. आपले विचार आपल्या शब्दात लिहा. कुणाचेही अनुकरण करु नका. माझा कागद आणि माझा पेन यांच्यात कोणीही येता कामा नये. असे स्वत:ला आणि इतरांना सांगा. लिहणं हे स्वत:शी बोलणंच असतं. असे मत बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, मनशक्ती केंद्राचे विश्र्वस्त प्रमोदभाई शिंदे, कार्यकारी विश्र्वस्त प्रल्हाद बापर्डेकर, विश्र्वस्त व संशोधन प्रमुख गजानन केळकर, बालसाहित्यकार राजीव तांबे, कवयित्री संगीता बर्वे, आश्र्लेषा महाजन, आदित्य दवणे, राजन लाखे, माधव राजगुरु, दीपक करंदीकर, वि.दा.पिंगळे उपस्थित होते. अवचट म्हणाले, फँटसीला कमी समजू नका किंवा वेडेपणाही मानू नका. त्यातून खूप काही निर्माण करता येऊ शकते. कला ही मन रमवणारी गोष्ट आहे. विशाल मन असेल तर इतरांच्या सुख दु:खात सामील होता येते. माणुसकीची संस्कृती साहित्याच्या माध्यमातूनच निर्माण होऊ शकते. मुले ही निसर्गाचे शुद्ध रुप आहेत. समाजाच्या सहवासात येताना त्यांचे व्यक्तिमत्त्व गढूळ होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रा.जोशी म्हणाले, ज्यांच्या खांद्यावर उद्याच्या साहित्य संस्कृतीची पालखी आहे असे बालकुमार साहित्याच्या आनंदापासून वंचित राहू नयेत यासाठी बालकुमार साहित्य संमेलने आयोजित करण्याचे साहित्य परिषदेने ठरविले आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मुलांचे भावनिक भरण पोषण करण्यासाठी साहित्याची नितांत आवश्यकता आहे. प्रमोद शिंदे म्हणाले मनशक्ती केंद्राने नेहमीच मुलांचे व्यक्तीमत्त्व बहुआयामी होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ही मुले साहित्याशी जोडली जावीत हा संमेलनाचा हेतू आहे. डॉ. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.
Start writing your post here. You can insert images and videos by clicking on the icons above.