मी मराठीच बोलेन... मी मराठीतूनच सही करेन
बालकुमारांनी संमेलनाच्या समारोपात केले ठराव
'मी मराठीच बोलेन... मी मराठीतूनच सही करेन ... मी रोज पुस्तकाचे एक पान वाचल्याशिवाय झोपणार नाही... माझ्या आयुष्यात अवांतर वाचनाला आणि खेळाला नेहमीच प्राधान्य देईन... मी मोबाईलचा कमीत कमी वापर करेन... मी मित्रांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुस्तकेच भेट देईन... मी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे ठराव बालकुमारांनी आवाजी मतदानाने मंजूर करून समारोपाचे सत्र दणाणून टाकले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे लोणावळा येथे आयोजन करण्यात आले होते. समारोपाला व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, मनशक्ती केंद्राचे विश्र्वस्त प्रमोदभाई शिंदे, कार्यकारी विश्र्वस्त प्रल्हाद बापर्डेकर, विश्र्वस्त व संशोधन प्रमुख गजानन केळकर, बालसाहित्यकार राजीव तांबे, कवयित्री संगीता बर्वे, आश्र्लेषा महाजन, आदित्य दवणे, राजन लाखे, माधव राजगुरु, दीपक करंदीकर, वि.दा.पिंगळे उपस्थित होते. उदघाटनानंतर ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या बालकवितांवर आधारित विशेष कार्यक्रम लेखक राजीव तांबे यांनी सादर केला. त्यांच्या भाषणाला आणि कवितांना बालकुमारांनी छान दाद दिली. कवयित्री डॉ. संगीता बर्वे, आश्लेषा महाजन आणि आदित्य दवणे यांनी 'लेखनाची आनंद वाट' या कार्यक्रमात बालकुमारांसाठी लेखन कार्यशाळा घेतली. 'आम्हालाही काही सांगायचंय' या विशेष कार्यक्रमात अनेक बालकुमारांनी लिहिलेल्या कथा, कविता आणि लेखांचे सादरीकरण केले. संमेलनात सहभागी झालेल्या सर्व बालकुमारांना मनशक्तीचा 'पंख मनांचे रंग क्षणांचे' हा दिवाळी अंक भेट देण्यात आला. समारोप करतांना प्रा. जोशी म्हणाले, अत्यंत साधेपणाने, कमी खर्चात झालेले आणि प्रचंड पाऊस असतानाही बालकुमारांच्या उत्स्फूर्त सहभागाने यशस्वी झालेले संमेलन म्हणून या संमेलनाची आठवण राहील. अंदर मावळातल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले याचे अधिक समाधान आहे. बालकुमार लिहिते आणि वाचते झाल्यास ते या संमेलनाचे खरे यश असेल. गजानन केळकर यांनी प्रास्ताविक केले. सुनीताराजे पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले.
Start writing your post here. You can insert images and videos by clicking on the icons above.