मसापच्या विभागीय साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी रंगनाथ पठारे स्वागताध्यक्षपदी नरेंद्र फिरोदिया, नो

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे सावेडी उपनगर शाखा, अहमदनगर आयोजित विभागीय मराठी साहित्य सम्मेलन ४ आणि ५ नोव्हेंबरला अहमदनगरला होणार आहे या सम्मेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करण्यात आली आहे. नरेंद्र फिरोदिया यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
विभागीय साहित्य सम्मेलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी नगर येथे प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, विभागीय सम्मेलनाचे निमंत्रक विनोद कुलकर्णी, सह निमंत्रक राजन लाखे, वि दा पिंगळे, नरेंद्र फिरोदिया, जयंत येलूलकर, स्नेहल उपाध्ये, सदानंद भणगे, भालचंद्र बालटे यांच्या सह शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले मसापच्या यंदाच्या विभागीय साहित्य सम्मेलनाच्या आयोजनाचा मान नगर इथल्या सावेडी उपनगर शाखेला मिळाला आहे. या सम्मेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करताना परिषदेला आनंद होत आहे. काळ बदलाच्या आणि मानवी बदलाच्या अखंड अशा सजीव प्रतिक्रियांचा मोठा आलेख पठारे यांनी आपल्या साहित्य कृतीतून मांडला आहे. प्रयोगशीलता जपणारे मराठी साहित्यातले वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकार म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य सम्मेलनात कविसंमेलन, परिसंवाद, महाचर्चा, प्रकट मुलाखत, ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रम,एकांकिका सादरीकरण, मनोरंजनाचे कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
रंगनाथ पठारे यांची साहित्यसंपदा
कादंबऱ्या :
दिवे गेलेले दिवस, रथ, चक्रव्यूह,हरण, टोकदार सावलीचे वर्तमान, ताम्रपट, दुःखाचे श्वापद, नामुष्कीचे स्वगत, त्रिधा, कुंठेचा लोलक, भर चौकातील अरण्यरुदन
कथासंग्रह :
अनुभव विकणे आहेत, स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग, ईश्वर मृताम्यास शांती देवो, गाभ्यातील प्रकाश, चित्रमय चतकोर, तीव्र कोमल दुःखातील प्रकरण, शंखातला माणूस
वैचारिक :
सत्वाची भाषा, आस्थेचे प्रश्न, छत्तीसगड, प्रश्नांकित विशेष
१९९९ मध्ये त्यांच्या 'ताम्रपट' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.