विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त ३० ऑक्टोबरला 'देणाऱ्याने देत जावे' हा विशेष कार्यक्रम
मसाप आणि अक्षरधारातर्फे आयोजन

पुणे : समग्र जीवन आपल्या कवितेतून कवेत घेणारे कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरधारा बुक ग्यालरी यांच्या संयुक्त विद्यमाने 'देणाऱ्याने देत जावे' या अर्थगंभीर कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ रोजी सायं. ६. ०० वाजता टिळक स्मारक मंदिरात करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठीची साहित्यनिवड, संहिता आणि बांधणी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची असून डॉ. अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक अभिवाचन करणार आहेत तर ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे गायन करणार आहेत. या कार्यक्रमाला विंदांच्या कन्या जयश्री काळे, परचुरे प्रकाशनाचे आप्पा परचुरे, उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे. कार्यक्रमासाठीच्या विनामूल्य प्रवेशिका अक्षरधारा बुक ग्यालरीच्या दीपावली शब्दोत्सवात आचार्य अत्रे सभागृह बाजीराव रोड येथे २८ ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार असून रसिकांनी त्या तेथून घ्याव्यात, असे प्रा. जोशी यांनी सांगितले.