'देणाऱ्याने देत जावे' तून उलगडले विंदा
पुणे : मानवी जीवनातील स्पंदनांचे पडसाद आपल्या कवितेतून उमटवणारे, स्त्रीमन जाणणारे, लहान मुलांची नस ओळखून त्यांच्यासाठी कविता लिहिणारे, देशसेवेसाठी कर्तव्य म्हणून तुरुंगात जाणारे, सुबक भाकरी करणारे, समरसून तबला वाजवणारे, हौसेखातर पिशवी घेऊन बाजारात जाणारे सुमाताईंचे 'तिरसिंगराव' पती... अशी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची विविध रूपे 'देणाऱ्याने देत जावे' या अनोख्या कार्यक्रमातून सोमवारी उलगडली. विंदांच्याच लेखनाविष्काराच्या अभिवाचनातून कार्यक्रमाची रंगत वाढली.

ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरधारा बुक ग्यालरीतर्फे 'देणाऱ्याने देत जावे' हा कार्यक्रम ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक, वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या अभिवाचनातून सादर झाला. अनुराधा मराठे यांनी विंदांच्या कवितांचे गायन केले. परचुरे प्रकाशनचे आप्पा परचुरे, विंदांच्या कन्या जयश्री काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, अक्षरधाराचे रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर, कल्याणी मांडके या वेळी उपस्थित होते. विंदा घरामध्ये कसे होते याबद्दलच्या आठवणींना काळे यांनी उजाळा दिला. घरची गरिबी, वार लावून जेवत आपले शिक्षण पूर्ण करत ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानापर्यंत पोहोचलेले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जाणारे, कर्तव्याच्या भावनेतून स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे मानधन नाकारणारे, घरी तन्मयतेने सुतारकामात रमणारे विंदा अशा पित्याच्या विविध आठवणी जयश्री काळे यांनी जागविल्या. परचुरे म्हणाले, 'स्वावलंबन, स्पष्टवक्तेपणा, साधी राहणी, चोखंदळपणा आणि शिस्त ही विंदांच्या जीवनाची पंचसूत्री होती. ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे अशा व्यक्तिमत्वांपैकी एक विंदा होते.
प्रा. जोशी म्हणाले, 'विंदांकडे जशी कठोर काव्यनिष्ठा होती तशीच अव्यभिचारी जीवननिष्ठा होती. जगण्याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. तत्त्वचिंतनाला काव्याच्या पातळीवरून व्यक्त करण्याचे असाधारण सामर्थ्य केशवसुत-मर्ढेकर आणि विंदांना जोडणारे सूत्र होते.
देणाऱ्याने देत जावे कार्यक्रमात विंदांच्या सामाजिक, स्त्रीविषयक, लहान मुलांच्या कविता, गाणी विरूपिका, विंदा आणि सुमाताईच्या सहजीवनाच्या गोष्टी तसेच विंदा-मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट त्रयीच्या मैत्रीचे किस्से अभिवाचनातून उलगडले आणि त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. उद्धव कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.