पुलोत्सवानिमित्त साहित्य परिषदेत ११ आणि १२ नोव्हेंबरला कार्यक्रम

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना आदरांजली वाहणाऱ्या चौदाव्या पुलोत्सवानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेत ११ आणि १२ नोव्हेंबरला दोन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ नोव्हेंबर (शनिवार) रोजी 'चार संपादक' या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगांवकर, गोविंद तळवलकर, अरुण साधू आणि ह. मो. मराठे यांच्या पत्रकारितेतील योगदानाविषयी रविमुकुल, राजीव खांडेकर, आनंद आगाशे आणि दिनकर गांगल बोलणार आहेत. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पुलंनी मराठी भाषेचे जे लाड केले, ज्याप्रकारे भाषेला वळवलं, खेळवलं त्यामुळे पुलंची साहित्यिक आणि रंगभूमीवरची कारकीर्द हा मराठी भाषेचा उत्सव ठरला. त्या उत्सवाची आठवण करून देणारी रंगतदार चर्चा 'शब्दप्रभू पु. लं.' या कार्यक्रमात १२ नोव्हेंबर (रविवार) रोजी होणार आहे. लेखिका मंगला गोडबोले, ज्येष्ठ लेखक मुकुंद टाकसाळे, डॉ. मंदार परांजपे, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि चंद्रकांत काळे त्यात सहभागी होणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम सकाळी ११ वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहेत.