महाराष्ट्र साहित्य परिषदे तर्फे दिवाळी अंक स्पर्धा
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गेली २० वर्षे दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे स्पर्धेसाठी आलेल्या दिवाळी अंकातून ४ सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांना अ. स. गोखले स्मृत्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक', चंद्रकांत शेवाळे (संपादित, ग्रहांकित) पुरस्कृत 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक', 'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' आणि 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' तसेच, दिवाळी अंकांतील उत्कृष्ट कथेसाठी 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक', उत्कृष्ट ललितलेखासाठी 'अनंत काणेकर पारितोषिक', उत्कृष्ट बालकुमारवाड्मय असलेल्या दिवाळी अंकास 'जानकीबाई केळकर पारितोषिक', तसेच डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट 'ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक' समारंभपूर्वक प्रदान केले जाते. या स्पर्धेला दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षी तब्बल दीडशेहून अधिक दिवाळी अंकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. यावर्षीही जास्तीत जास्त दिवाळी अंकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रंथालय विभागाचे कार्यवाह व या स्पर्धेचे निमंत्रक वि. दा. पिंगळे यांनी केले.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्यांनी आपल्या दिवाळी अंकांच्या २ प्रती कार्यवाह, ग्रंथालय विभाग, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे -३० या पत्त्यावर दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत प्रत्यक्ष आणून द्याव्यात किंवा पोस्टाने / कुरिअरने पाठवाव्यात, अशी माहिती कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी दिली.