साहित्य परिषदेत हास्यवंदनेतून 'पु. लं.'ना अभिवादन
महाराष्ट्र साहित्य परिषदेत ‘आम्ही एकपात्री’ या संस्थेच्या कलाकारांनी पु.लं.ना आपल्या विविधरंगी विनोदी सादरीकरणांनी 'हास्यवंदना' दिली. आम्ही एकपात्री आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ख्यातनाम साहित्यिक आणि कलावंत पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला, एकपात्री दिनानिमित्त आयोजित 'हास्यवंदना' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वंदन नगरकर यांनी रामनगरीमधले अनेक धमाल किस्से सादर केले. संतोष चोरडिया यांनी विविध कलाकारांच्या आवाजात पु.लं.ना अभिवादन केले. पु.लं.च्या साहित्यातील ‘एक चौकोनी कुटुंब’ आणि ‘नंदा प्रधान’ या लेखांचे संपादित सादरीकरण उज्वला कुलकर्णी यांनी केले. तर बंडा जोशी यांनी आपल्या लग्नसमारंभाची चित्तरकथा ऐकवून रसिकांना खळखळून हसवले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. जोशी म्हणाले, पु. ल. हे बहुमुखी प्रतिभावंत होते. त्यांच्या साहित्याने मराठी माणसांना रसरशीत जीवनदृष्टी दिली. त्यांचा विनोद जखमा करणारा किंवा बोचकारणारा नव्हता गुदगुल्या करून हसवणारा होता. आज समाजाची विनोद बुद्धी क्षीण होत चालली आहे. हे सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण आहे.
या कार्यक्रमाला रसिकांनी ओव्हरफूल गर्दी केली होती. रसिकांची मनापासून दाद आणि प्रतिसादाने ही हास्यवंदना धमाल रंगली. आम्ही एकपात्रीचे अध्यक्ष संतोष चोरडिया यांनी प्रास्ताविक केले. अदिती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली तर चंद्रकांत परांजपे यांनी आभार मानले.
