समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. हरिश्चंद्र थोरात
२९ आणि ३० नोव्हेंबरला साताऱ्याला होणार संमेलन

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी (सातारा) आणि छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन २९ आणि ३० नोव्हेंबरला साताऱ्याला होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. समीक्षा : सिद्धांत आणि व्यवहार असे सूत्र असणाऱ्या या संमेलनाचे उदघाटन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाला स्वागताध्यक्ष संतोष यादव, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, संमेलनाचे समन्वयक किशोर बेडकिहाळ, उपप्राचार्य आर. एस. काळे, डॉ. अनिसा मुजावर, मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, संमेलनाचे निमंत्रक विनोद कुलकर्णी, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, सोपानराव चव्हाण, सहनिमंत्रक राजन लाखे, वि. दा. पिंगळे, प्राचार्य तानसेन जगताप यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. प्रा. जोशी म्हणाले, 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उत्सवी वातावरणात गंभीरपणे साहित्यचर्चा होत नाही अशी अनेक सारस्वतांची खंत होती त्यामुळे समीक्षा संमेलन घेण्यास साहित्य परिषदेने सुरुवात केली. यापूर्वी प्रा. के. रं. शिरवाडकर, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. दिलीप धोंडगे या मान्यवरांनी समीक्षा संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. यावर्षी प्रथमच हे संमेलन दोन दिवसांचे होणार आहे. उदघाटनानंतर २९ नोव्हेंबरला पहिल्या सत्रात 'समीक्षेची संकल्पना आणि कार्य' या विषयावरील चर्चासत्र प्रा. रेखा साने-इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यात तृप्ती करीकट्टी आणि नितीन जरंडीकर सहभागी होणार आहेत. समीक्षा आणि आंतरविद्याशाखीयता या विषयावर दुसरे चर्चासत्र अशोक चौसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यात राहूल कोसंबी आणि उदय रोटे सहभागी होणार आहेत. त्यानंतर शोधनिबंधाचे सादरीकरण दोन स्वतंत्र सत्रात होणार असून प्रा. संतोष पवार आणि डॉ. प्रभंजन चव्हाण या सत्राचे अध्यक्ष असतील. ३० नोव्हेंबरला 'समीक्षा व्यवहाराचे विविध पैलू' हे चर्चासत्र वंदना भागवत यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यात चिन्मय धारूरकर, प्रविण बांदेकर, कैलास जोशी सहभागी होणार आहेत. त्यानंतर समकालीन मराठी समीक्षा हे चर्चासत्र प्रा. अविनाश सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यात प्रशांत धांडे आणि प्रा. रणधीर शिंदे सहभागी होणार आहेत.