संघर्षाची आत्मकथा ऐकताना भारावली नूमवि प्रशालेतील मुले
सापच्या 'लेखक तुमच्या भेटीला' उपक्रमात इंदुमती जोंधळे यांनी उलगडला जीवनप्रवास पुणे : मला घरच नव्हतं... भूक लागल्यानंतर पोटात आग पडायची... दिवाळी आणि मेच्या सुट्टीत वसतिगृहात जेवायला मिळायचं नाही... अशावेळी थंडगार पाणी पिऊन भूक भागवायची... भूक विसरण्यासाठी पुस्तकं वाचायची, या पुस्तकांनी खूप दिलं आणि माझं आयुष्य घडवलं... अशा शब्दात बिनपटाची चौकट या पुस्तकाच्या लेखिका इंदुमती जोंधळे यांनी आपला जीवनप्रवास उलगडला आणि त्यांची ही संघर्षमय आत्मकथा ऐकताना मुले भारावली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात नूमवि प्रशालेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जोंधळे बोलत होत्या. यावेळी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, कार्यवाह माधव राजगुरू, मुख्याध्यापिका संजीवनी ओमसे, उपमुख्याध्यापिका सरिता गोखले, भरत सुरसे, दिलीप गरुड, मच्छिन्द्र सातव, अर्चना सावंत उपस्थित होते. इयत्ता १० वी च्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात इंदुमती जोंधळे यांचा 'आत्मनिर्भरतेसाठीची वाटचाल' हा धडा विध्यार्थ्यांना अभ्यासासाठी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लेखिकेला भेटताना मुले आनंदून गेली.

जोंधळे म्हणाल्या, आयुष्य सरळ साधं कधीच नसतं, उद्याच्या आशेवर माणूस जगत असतो. मी ही कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणा यांची साथ न सोडता संघर्ष करीत राहिले. विनोबा भावे, बाबा आमटे यांच्या सहवासाने जीवनदृष्टी मिळाली. माणूस किती मोठा झाला यापेक्षा कसा मोठा झाला, याला खूप महत्व आहे. मुलांनो तुम्हीच तुमचे भाग्यविधाते आहात. आपल्याला काय व्हायचंय ते आत्ताच ठरावा. आयुष्यात कधीही रडू नका, नाराज होऊ नका, अपयश आलं तरी नाउमेद होऊ नका. प्रामाणिकपणा हा सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ आणि आयुष्याला वेगळे परिमाण देणारा असतो.
प्रा जोशी म्हणाले, पुस्तकासारखा सच्चा मित्र शोधून सापडणार नाही. पुस्तकांमुळे मने प्रज्वलित होतात.अभ्यासाच्या पुस्तकांच्या पलीकडे मोठे जग आहे ते ललित साहित्याच्या वाचनातून समजून घ्या. तंत्रज्ञानाच्या आहारी जावू नका. भावना जागवायला आणि मने फुलवायला विचारच उपयोगी पडतात ते पुस्तकातून मिळतात