आप्पा खोतांच्या कथाकथनाने साहित्य परिषदेमध्ये हास्यकल्लोळ
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'कथासुगंध' या कार्यक्रमात आप्पा खोत यांचे कथाकथन

‘मरणाघरी आणि तोरणादारी माणसांनी जबाबदारीने वागावे ही साधी अपेक्षा; पण मरण पावलेल्या म्हातारीच्या घरी गावातील इरसाल बायका-माणसे कशी वागतात याचे भन्नाट नमुने आपल्या खास -शैलीत सादर करीत, 'मढं गाजविणे' या वाकप्रचाराचा उपयोग ग्रामीण भागातले लोक प्रत्यक्ष जीवनात कसा करतात याच्या गमतीशीर गोष्टी सांगत ज्येष्ठ ग्रामीण कथाकार आणि कथाकथनकार प्रा. आप्पा खोत यांनी साहित्य रसिकांना खळखळून हसविले. त्यांच्या कथाकथनाचा आनंद घेण्यासाठी साहित्य रसिकांनी माधवराव पटवर्धन सभागृहात गर्दी केली होती. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या 'कथासुगंध' या कार्यक्रमाचे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित होते. या वेळी ‘मरणाघरी’ ही धमाल विनोदी कथा प्रा. आप्पा खोत यांनी सादर केली. कथेमागची कथा उलगडून सांगताना प्रा. खोत म्हणाले, “कथा लेखकाच्या आसपास घुटमळत असते. तिचे कथाबीज कथालेखकाला शोधता आले पाहिजे. मरणासारख्या गंभीर प्रसंगातही मनुष्य स्वभावातल्या विसंगतीचे दर्शन घडते. ज्यांच्याघरी दुःखद प्रसंग घडलेला असतो त्या घरालाच दुःख होते. इतर लोक केवळ औपचारिकता पार पाडत असतात त्यातून दुःखद प्रसंगातही कशी विनोदनिर्मिती होती याचे चित्रण 'मरणाघरी' या कथेत आहे. माझ्या उमेदवारीच्या काळात परिषदेच्या वतीने आयोजित कथालेखन स्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला, माझ्या पहिल्या कथासंग्रहाला परिषदेचा ग. ल. ठोकळ पुरस्कार मिळाला. मला विभागीय संमेलनात आणि अखिल भारतीय संमेलनात कथाकथन करण्याची संधी प्रथम परिषदेनेच दिली. त्यामुळे मला कथाकार आणि कथाकथनकार म्हणून नाव मिळाले. माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या लेखकांकडे समीक्षकांनी दुर्लक्ष केले असले तरी परिषदेने मला नेहमीच उत्तेजन आणि प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी साहित्य परिषदेच्या ऋणात आहे.”
वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.
