राजवाडेंच्या वृत्तीतली निर्भयता आजच्या विचारवंतात नाही : डॉ. श्री. मा. भावे
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मसापतर्फे सत्कार
आजचे विचारवंत समाजाला आवडणारे आणि पटणारे विचारच मांडतात. आहिताग्नी राजवाडे याला अपवाद होते अफाट व्यासंग आणि सूक्ष्म अभ्यासातून स्वतःला पटलेला आणि समाजाला न आवडणारा आणि पटणारा विचार त्यांनी ठामपणे मांडला. त्यांनी ज्ञानसाधना करताना लोकानूनय केला नाही आहिताग्नी राजवाडे यांच्यासारखी वृत्तीतली निर्भयता आजच्या विचारवंतात नाही, असे मत इतिहास संशोधक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. श्री. मा. भावे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आहिताग्नी राजवाडे स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तपस्वी आहिताग्नी राजवाडे या विषयावर व्याख्यान गुंफताना ते बोलत होते. भावे यांची इतिहास संशोधक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल परिषदेच्यावतीने त्यांचा कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, शैला मुकुंद यावेळी उपस्थित होते.
डॉ. भावे म्हणाले, प्राचीन शास्त्राचे गाढे अभ्यासक असणाऱ्या आणि अग्निहोत्राचा स्वीकार करणाऱ्या राजवाडेंना कोणताही विषय वर्ज्य नव्हता. संगीत, नृत्य आणि नाटक याविषयीचे त्यांचे लेखन महत्त्वाचे आहे. ते संस्कृती टीका करणारे निर्भीड आणि व्रतस्थ विचारवंत होते. ते नियमित रोजनिशी लिहीत असत. त्यांच्या आत्मचरित्रातून महत्त्वाचा कालखंड उलगडला आहे.
प्रा. जोशी म्हणाले, 'महाराष्ट्रातील ज्ञानोपासकांच्या परंपरेत आहिताग्नी राजवाडेंचे स्थान खूप वरचे आहे. पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांनी अनेक अभ्यास आणि संशोधन विषय निर्माण करून ठेवले आहेत.
शैला मुकुंद यांनी राजवाडे यांच्या संकेत स्थळाविषयी माहिती दिली. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

परिषदेच्या सत्काराने भारावले श्री मा
भावे यांची इतिहास संशोधक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल परिषदेच्या वतीने त्यांचा कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि इतिहास संशोधक मंडळ या भगिनी संस्था आहेत. परिषदेची स्थापना १९०६ साली झाली तर इतिहास संशोधक मंडळाची स्थापना १९१० साली झाली. दत्तो वामन पोतदार, चिं. ग. कर्वे यांच्यासारख्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिषदेच्या कार्यातही मोलाचे योगदान दिले. असा या दोन संस्थांचा स्नेहबंध आहे, त्यामुळे परिषदेने केलेल्या सत्काराने भारावलो आहे. अशी भावना श्री. मा. भावे यांनी व्यक्त केली.