सामाजिक भान हीच मराठी कवितेची खरी श्रीमंती आहे : कवी उद्धव कानडे
मसाप व अक्षरभारती तर्फे 'महात्मा फुले अभिवादन कविसंमेलन'
"महात्मा फुले यांनी आपल्या अखंडातून आणि केशवसुतांनी कवितेतून समृद्ध सामाजिक अशयाद्वारे मराठी कवितेला श्रीमंती प्राप्त करून दिली. मराठी कविता याच मूल्यविचारांच्या पायावरती आज उभी आहे. इथला सारा समाज माझा आहे. धर्म, जात कोणतीही असुदे कवी हा चांगला माणूस असणं फार महत्त्वाचं आहे. समतेचा विचार जगणारा कवीच समाजजीवनाला सुंदर बनवू शकतो. समाजनिष्ठ कवी समाजात नवी क्रांती घडवू शकतो. ज्याचं हृदय अंतर्बाह्य मानवतेच्या विचारांनी फुललेलं असतं तोच कवी समतेचं गाणं गाऊ शकतो. कवीने जीवनातल्या सुंदरतेची उपासना केली पाहिजे. सामाजिक भान हीच मराठी कवितेची खरी श्रीमंती आहे." असे मत 'महात्मा फुले अभिवादन कविसंमेलना’चे अध्यक्ष ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी व्यक्त केले. महात्मा फुले यांच्या १२७ व्या पुण्यतिथी निमित्त अक्षरभारती, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा विश्रांतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 'महात्मा फुले अभिवादन कविसंमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, अक्षरभारतीचे माधव राजगुरू, डॉ. अविनाश सांगोलेकर उपस्थित होते.
कानडे पुढे म्हणाले, “कविता म्हणजे समाजाच्या भावभावनांचा मेळ असतो. जात, धर्म, पंथ, वर्ण यांच्या पलीकडे जाऊन कवींनी समतेचा ध्वज खांद्यावर घेतला पाहिजे.”
प्रा. जोशी म्हणाले, “कवींनी व्यवस्थेला प्रश्न विचारायला हवेत. त्यासाठी किंमत चुकविण्याची तयारी हवी. जोतिबांनी लोकशाही, स्वातंत्र्य, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन या आधुनिक मूल्यांची रुजवण केली. जागतिकीकरणाने शोषणाच्या नव्या व्यवस्था तयार केल्या आहेत, त्या विरुद्ध लढण्यासाठी कवींनी सज्ज राहिले पाहिजे.
यावेळी कवी दीपक करंदीकर यांनी 'जयोस्तुते ज्योतिबा फुले' ही कविता सादर करून रसिकांची उस्फूर्त दाद मिळवली. कवी बंडा जोशी, अंजली कुलकर्णी, ज्योत्स्ना चांदगुडे, वि. दा. पिंगळे, विश्वास गांगुर्डे, धनंजय तडवळकर, विनोद अष्टुळ, महेंद्रकुमार गायकवाड, चैतन्य डुंबरे, रमेश जाधव, सुरेश गायकवाड, सुरेश पाटोळे, सागर काकडे, श्रीकृष्ण शाळीग्राम, प्रल्हाद जाधव आणि स्वछंद यांनी आपली आपली कविता सादर केली. अशा अनेक कवींनी आपल्या कवितांमधून महात्मा फुले यांना अभिवादन केले. प्रास्ताविक डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी केले. आभार प्रा. बाबा शेंडगे आणि सूत्रसंचालन प्रसिद्ध कवयित्री प्रा. रुपाली अवचरे यांनी केले.
