"प्रेमचंद यांनी समाजमनाची सूक्ष्म स्पंदने साहित्यात टिपली ": डॉ. दामोदर खडसे
मसापच्या का. र. मित्र व्याख्यानमालेला प्रारंभ
पुणे : 'हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या साहित्याने समाजाला स्वातंत्र्य लढ्यासाठी तयार केले. लोकांमध्ये चेतना निर्माण केली. त्याच बरोबर समाजातील धर्मांधता, जातिभेद, अंधश्रद्धा, रूढीपरंपरा यांच्यावर त्यांनी आपल्या लेखनातून प्रहार केले. प्रेमचंद यांनी समाजमनाची सूक्ष स्पंदने आपल्या साहित्यात टिपली.' असे मत प्रसिद्ध अनुवादक डॉ. दामोदर खडसे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मासिक मनोरंजनकार का. र. मित्र व्याख्यान उदघाटन करताना ते बोलत होते. प्रेमचंद यांचे साहित्यविश्व हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.
खडसे म्हणाले, ''छपन्न वर्षांचे आयुष्य लाभलेल्या प्रेमचंदांनी पस्तीसवर्षे अखंड लेखन केले. 'कादंबरी सम्राट' अशीच त्यांची ओळख जागतिक साहित्य विश्वाला आहे. समकालीन समाज वास्तवतेचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात ठळकपणे दिसते. बारा कादंबऱ्या आणि तीनशे कथा लिहिणाऱ्या प्रेमचंदांचे साहित्य सर्व भारतीय भाषात आणि जगातल्या सर्व भाषात अनुवादित झाले आहे. ते उत्तम संपादक होते. त्यांच्या लेखणीने धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक शोषणाविरुद्ध आवाज उठविला आणि शोषितांचे जग समाजासमोर आणले.' प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.

भाषाभगिनींमध्ये संवादाचा पूल निर्माण व्हावा
'मसापच्या का. र. मित्र व्यख्यानमालेत अन्य भाषांतील साहित्यिक आणि त्यांचे साहित्य'
या विषयावर व्यख्यान होणार आहेत याचा मनस्वी आनंद झाला आहे असे नमूद करून भारतीय भाषाभगिनीमध्ये संवादाचा पूल निर्माण व्हावा अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली. मृत्युंजयकार शिवाजी सावंत हे हिंदी साहित्य विश्वात सर्वानाच परिचित असणारे मराठी लेखक आहेत. २००४ साली हिंदी साहित्य विश्वात कोणत्या लेखकाला सर्वाधिक रॉयल्टी मिळाली याचे सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचे नाव पहिल्या स्थानावर होते. समस्त मराठी बांधवांना अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे. मराठीतील कसदार साहित्य कृतीचा अन्य भाषांत अनुवाद होणे गरजेचे आहे. असे त्यांनी यावेळी नमूद केले.