मराठीच्या ‘अभिजात’ दर्जासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन
मुंबईत शिष्टमंडळाशी प्रस्तावाबाबत चर्चा

पुणे, दि. 11 (प्रतिनिधी)- मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून आता केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. या साहित्य परिषदेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळावा यासाठी पूर्ण प्रयत्न करेन असे आश्वासन केंद्रीय भुपृष्ठ, वाहतूक व नौवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले. मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, मसाप पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे, अविनाश कदम, डॉ. सचिन जाधव, सुरेंद्र वारद यांनी गडकरी यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. प्रा. रंगनाथ पठारे समितीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीच्या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर त्यावर कार्यवाही होण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने केंद्रशासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची माहिती प्रा. मिलिंद जोशी यांनी गडकरी यांना दिली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे गरजेचे असून 11 कोटी मराठी जनतेच्या अस्मितेचा हा विषय आहे, असे सांगितले यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनीमराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करु. अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. त्यामुळे आता मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासंदर्भात आशा पल्लवित झाल्या आहेत.