राजेंद्र बनहट्टी यांच्या गौरवार्थ साहित्य परिषदेत स्त्रीप्रधान व्याख्याने

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र बनहट्टी हे १४ जानेवारी रोजी ८० वर्षांचे होत आहेत आणि ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे चिरंजीव आणि सुविचार प्रकाशन मंडळ या प्रकाशन संस्थेचे संचालक श्री. चैतन्य बनहट्टी आणि कन्या डॉ. सौ. पद्मिनी सुधीर यांनी साहित्य परिषदेला देणगी दिली आहे. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी साहित्य परिषद राजेंद्र बनहट्टी यांच्या गौरवार्थ दोन व्याख्याने आयोजित करणार आहे. ही व्याख्याने स्त्री प्रधान असणार आहेत. स्त्रियांचे साहित्य व कला क्षेत्रातील योगदान, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातील स्त्रियांचे कार्य तसेच स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि नैतिक समस्या अशा महिलांशी संबंधित विषयांवर प्रामुख्याने ही व्याख्याने होणार आहेत. या व्याख्यानांच्या वक्त्याही मुख्यत्वेकरून स्त्रियांच असणार आहेत.
यंदा ही व्याख्याने एप्रिल अखेर किंवा मेच्या आरंभी साहित्य परिषदेत होणार आहेत. असे या व्याख्यानांचे संयोजक आणि साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी कळविले आहे.