'अभिजात साठी 'मसाप' चा दिल्लीत आवाज'
पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिल्लीत धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता पण दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेला अभिजातचा दर्जा देण्याची सद्सद्विवेकबुद्धी केंद्र सरकारला मिळावी यासाठीशिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर प्रार्थना केली आणि जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी,साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ ,पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे, लेखक राजेंद्र माने, डॉ. उमेश करंबळेकर यांच्यासह अनेक मराठी प्रेमी यावेळी उपस्थित होते. प्रा. जोशी म्हणाले, 'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीच्या सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली असतानाही देशातील सहा भाषांना अभिजातचा दर्जा देणारे केंद्रसरकार मराठीला हा दर्जा देण्यासाठी मात्र चालढकल करत आहे. हा विषय मार्गी लागावा यासाठी साहित्य परिषदेने लोकचळवळ सुरू केली. पंतप्रधान कार्यालयाला एक लाखाहून अधिक पत्र पाठवली. सातत्याने पत्रव्यवहार केला. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांशी संपर्क साधला. राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्यामुळे हे काम होऊ शकले नाही. अभिजात दर्जासाठी आता केवळ केंद्रीय मंत्री मंडळाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. मराठीला अभिजात चा दर्जा मिळणे हा मराठी अस्मितेचा विषय आहे. 27 फेब्रुवारीपूर्वी (मराठी भाषा दिनापूर्वी) अभिजात चा निर्णय जाहीर न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सर्व राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या विषयासाठी एकत्र येणे जरुरीचे आहे.
