'आयुष्यावर कधीही रुसू नका' डॉ. संगीता बर्वे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला'
भारती विद्यापीठाच्या शंकरराव मोरे विद्यालयात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'लेखक तुमच्या भेटीला' कार्यक्रम
पुणे : कधी न रुसावे आयुष्यावर अडचणीतही सदा हसावे किती जाहले कष्ट तरीही समाधान परी मुखी दिसावे असा संदेश कवितेतून अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. संगीत बर्वे यांनी भारती विद्यापीठाच्या aशंकरराव मोरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना दिला. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमाचे. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह माधव राजगुरू, प्राचार्य के. एच. पाटील, पर्यवेक्षक सी. एस. सगरे उपस्थित होते.

बर्वे म्हणाल्या, ' 'भाषेशी गंमत करायला शिका, त्यातून भाषेतला आनंद तुम्हाला समजेल आपले विचार आपल्याला शब्दात मांडता येणे ही एक कला आहे. ती आत्मसात केली पाहिजे त्यातूनच आपल्याला आत्मविश्वास मिळतो. अभ्यासाइतका आयुष्यात आत्मविश्वासही महत्वाचा आहे.'
जोशी म्हणाले, 'शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनसत्वे अन्नातून मिळतात, मन आणि बुद्धीच्या भरणपोषणासाठी आवश्यक सत्व साहित्यातून मिळते. मनात आशादायक विचारांचा दीप नेहमी तेवत ठेवा. मनात दाटून आलेली निराशा दूर करण्याचे सामर्थ्य साहित्यात आहे. पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे जे जग आहे ते समजून घेण्यासाठी साहित्याची कास धरा.'
के. एच. पाटील आणि माधव राजगुरू यांनी मनोगत व्यक्त केले. सी. एस. सगरे यांनी आभार मानले. एम. एस. केसकर यांनी सूत्रसंचालन केले.