'रामगणेशाय नमः' तून उलगडले भाषाप्रभू गडकरी
स्मृतिशताब्दी प्रारंभानिमित्त 'मसापचे' अभिवादन
पुणे : प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन, एकच प्याला या अजरामर नाटकातील निवडक नाट्यांशांचे अभिवाचन... गोविंदाग्रज या टोपणनावाने लिहिलेल्या 'वाग्वैजयंती' मधील कवितांचे सादरीकरण. . . आणि बाळकराम या टोपणनावाने लिहिलेल्या विनोदी लेखनाच्या अभिवाचनातून नाटककार, कवी आणि विनोदी लेखक भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचा साहित्य आणि जीवनप्रवास उलगडला. निमित्त होते राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी प्रारंभानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या 'रामगणेशाय नमः' या कार्यक्रमाचे यासाठी संहिता लेखन ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे आणि विजय गोविंद कुलकर्णी यांनी केले होते. अभिवाचन विजय गोविंद कुलकर्णी यांनी केले. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह बंडा जोशी उपस्थित होते. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
श्रीराम रानडे म्हणाले, 'गडकऱ्यांची नाटके काल होती आज आहेत उद्याही राहतील. नव्या पिढीपर्यंत त्यांच्यासाहित्याचा अनमोल ठेवा पोहोचविण्याचा प्रयत्न गडकरी यांच्या स्मृतिशताब्दीवर्षात करणार आहोत.'

गडकरी हे गुरुशिष्य परंपरा मानणारे अलौकिक प्रतिभावंत : प्रा. जोशी
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या नाटकांचा आणि विनोद लेखनाचा प्रभाव भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्यावर होता. म्हणून गडकऱ्यांनी त्यांना गुरु मानले. केशवसुतांच्या तुतारी, हरपले श्रेय या बंडखोर आशय मांडणाऱ्या कवितांचा प्रभाव गोविंदाग्रज या टोपणनावाने काव्य लेखन करणाऱ्या गडकऱ्यांवर होता त्यांनी केशवसुतांना काव्यगुरु मानले होते. गडकरी हे साहित्यक्षेत्रात गुरु शिष्य परंपरा मानणारे अलौकिक प्रतिभावंत होते. असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
जोशी म्हणाले, 'काव्य कराया जित्या जीवांचे जातिवंत करणेच हवे। ही गडकऱ्यांची काव्य दृष्टी होती. भाषेचे सौंदर्य, कल्पनेचे वैभव आणि उत्कट भावनाविष्कार यांचा संगम त्यांच्या काव्यात आहे. नाटकांचे प्रयोग डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी नाट्य लेखन केले नाही. नाटककारातील कल्पना शक्तीच्या विलासाला त्यांनी प्राधान्य दिले. अतिशयोक्ती, उपहास, शाब्दिक कोटी शब्दविपर्यास, अपेक्षाभंग, प्रौढ आणि भारदस्त भाषाशैलीद्वारे साधला जाणारा विनोद ही बाळकराम या टोपणनावाने विनोदी लेखन करणाऱ्या गडकऱ्यांच्या विनोदाची वैशिष्ट्ये होती.