'मसाप गप्पा' मध्ये डॉ. माधव गोडबोले यांच्याशी गप्पा

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' कार्यक्रमात माजी केन्द्रीय गृह व न्यायसचिव आणि सामाजिक जीवन व धोरणासंबंधीच्या वीस महत्वपूर्ण मराठी आणि इंग्रजी पुस्तकाचे लेखक डॉ. माधव गोडबोले सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ डॉ. गोडबोले यांच्याशी संवाद साधणार आहेत. जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व-एक सिंहावलोकन, लोकपालाची मोहिनी, सुशासन हे दिवास्वप्नच, सत्ता आणि शहाणपण, प्रशासनाचे पैलू खंड १ आणि २, नव्या दिशा बदलते संदर्भ, धर्मनिरपेक्षता-धोक्याच्या वळणावर, भारतीय संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा, फाळणीचे हत्याकांड ही डॉ. माधव गोडबोले यांची पुस्तके गाजली आहेत. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या 'इंदिरा गांधी एक वादळी पर्व' या पुस्तकाची सध्या खूप चर्चा आहे. वैचारिक लेखनासाठीच्या अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी डॉ. गोडबोले यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सोमवार दि. १२ फेब्रुवारी २०१८ रोजी सायं. ६.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.