साहित्य परिषदेत सावरकरगीते ऐकताना साहित्य रसिक भारावले प्राण सागरा तळमळला या कार्यक्रमातून सावरकरां

पुणे : शतजन्म शोधिताना, मला देवाचे दर्शन घेऊ द्या, हे मातृभूमी तुजला, की न व्रत घेतले हे आम्ही अंधतेने, ने मजसि ने परत मातृभूमीला, जयोस्तुते श्री महन्मंगले या सारख्या प्रखर राष्ट्रभक्तीने भारलेल्या आणि मातृभूमीच्या ओढीने लिहिलेल्या, विनायक दामोदर
सावरकरांच्या प्रसिद्ध कविता, गीते, नाट्यपदे ऐकण्याचा दुर्मिळ योग् महाराष्ट्र साहित्य परिषद आणि झलक पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य रसिकांना आला आणि सावरकर गीते ऐकताना साहित्यरसिक भारावून गेले. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. पटवर्धन सभागृहात आणि गॅलरीत लोक दाटीवाटीने बसले होते. निमित्त होते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५२ व्या पुण्यतिथीचे! यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर उपस्थित होते.

अविनाश वैजापूरकर यांच्या झलक पुणे या संस्थेचे श्रीपाद भावे, अविनाश वैजापूरकर, पदमजा बंकापूरे, प्रतिभा देशपांडे, प्राजक्ता मांडके, प्रसन्न बाम, चंद्रकांत रोंघे व समीर बंकापूरे या सर्व कलावंतांनी हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. शिक्षणतज्ज्ञ आणि सावरकर साहित्याचे अभ्यासक डॉ. प्र. ल. गावडे यांनी 'सागरा प्राण तळमळला' या विशेष कार्यक्रमाचे संहितालेखन केले. सावरकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद झोंबणारा होता: प्रा. जोशी भारतीय स्वातंत्र्यलढ्याची प्रज्वलित झालेली ज्योत सावरकरांनी आपल्या योगदानाने तेजस्वी केली स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील धगधगते अग्निकुंड होते.सावरकरांच्या चरित्रात स्वातंत्र्यनिष्ठा,विज्ञाननिष्ठा, साहित्यनिष्ठा आणि हिंदुत्वनिष्ठा यांचा संगम आढळतो.सावरकरांनी जेवढे राजकारण केले त्यापेक्षा अधिक समाजकारण केले. सावरकरांचा बुद्धिप्रामाण्यवाद हा झोंबणारा होता असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. प्रा. जोशी म्हणाले, 'आचारप्रेम आणि कर्मकांडामुळे हिंदू धर्माला अवकळा आली आहे असे मानणाऱ्या सावरकरांनी नवससायास, व्रतवैकल्ये, सत्यनारायण, विटाळ, पूजा, भटजी, अस्पृश्यता या सर्वांवर कडाडून टीका केली.जातीव्यवस्थेच्या चौकटी मोडून टाकण्यासाठी त्यांनी सामाजिक क्रांतिघोषणा केली. वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी या सात स्वदेशी बेड्या तोडून टाका असे सांगितले.धर्मवेडाची नांगी ठेचायची असेल तर समाजाचा पोथीनिष्ठ दृष्टीकोन बदलून तो विज्ञाननिष्ठ होणे गरजेचे आहे आणि.विज्ञाननिष्ठ समाज निर्मिती साठी यंत्रयुगाचे स्वागत केले पाहिजे असे सावरकरांचे सांगणे होते.