कवितेचे श्रेष्ठत्व विषयावरून ठरत नाही : प्रा. रेखा इनामदार-साने
कवितेचे श्रेष्ठत्व विषयावरून ठरत नाही : प्रा. रेखा इनामदार-साने
साहित्य परिषदेत कवी यशवंत पुरस्काराचे वितरण

पुणे : कवितेला कोणताही विषय वर्ज्य नाही. गुलाबाच्या फुलावर कविता केली म्हणून ती दुय्यम ठरत नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कविता केली म्हणून ती श्रेष्ठ ठरत नाही. विषयावरून कवितेचे श्रेष्ठत्व ठरत नाही. असे मत ज्येष्ठ समीक्षक प्रा. रेखा इनामदार-साने यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कवी शांताराम खामकर यांच्या 'भवताल' या कवितासंग्रहाला कवी यशवंत पुरस्काराने प्रा. साने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह बंडा जोशी उपस्थित होते. साने म्हणाल्या, 'कविता ही कथाही नसते आणि कादंबरी ही नसते. अतिशय तरल आणि सूक्ष्म अनुभव नेमक्या शब्दात मांडता येणे महत्वाचे आहे. कवितेची वाट वर वर सोपी दिसत असली तरी अवघड आहे. प्रा. जोशी म्हणाले, 'आजचा वाड्मयीन भवताल प्रदूषित झाला आहे. प्रतिभेच्या नव्या कोंभाना अंकुरण्या आधीच नाऊमेद केले जाते. साहित्य क्षेत्र पोटदुखीने त्रस्त आहे. संमकालिनांनी लेखक कवींना बळ दिले पाहिजे.
खामकर म्हणाले, ' माझ्या कवितेला नाऊमेद करण्याचे खूप प्रयत्न झाले. सामाजिक, अन्याय या विषयावर कविता लिहिल्याचं पाहिजे असे अनेकांनी सुचवले. कवींना आपापल्या पिंडानुसार कविता लिहिण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. कार्यवाह बंडा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले.