top of page

मसाप ब्लॉग  

सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण : डॉ. आशुतोष जावडेकर

सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण : डॉ. आशुतोष जावडेकर

मसापचे युवा साहित्य-नाट्य संमेलन उत्साहात संपन्न

पुणे - प्रेम आणि खदखद व्यक्त करण्याचा अधिकार युवा पिढीला मिळायला पाहिजे, सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे, आणि ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूर आणि राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीतर्फे आयोजित युवा नाट्य साहित्य संमेलनात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, धैर्यशील पाटील, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, राजारामबापू सहकारी बँक लिमिटेडचे चेअरमन श्यामराव पाटील, मसापच्या इस्लामपूर शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, विभागीय संमेलनाचे निमंत्रक विनोद कुलकर्णी, सहनिमंत्रक, तानसेन जगताप आणि परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

डॉ. जावडेकर म्हणाले, "फेसबुक पोस्ट हा साहित्याचा नवा प्रकार आहे. इथे लोकशाही आहे; परंतु इथले मार्केटिंग धोकादायक आहे. मराठीत अन्य भाषेतील येणाऱ्या शब्दांची भीती अवाजवी आहे. प्रमाणभाषा नकोच ही भूमिका चुकीची आहे. कोणतेही साहित्य हे मूलतः सामाजिक आणि राजकीयच असते. सत्तेला तोंड देताना साहित्यिकांना काही दरडावून सांगता येत नसेल तर नक्कीच दोन्हीत काहीतरी अंतर आहे, हे समजून घ्यावे लागेल. संमेलनाची गरज आहे. त्यातून वाचक घडतो. अनेकांना व्यासपीठ मिळते." खरा वाचकवर्ग ग्रामीण आणि निमशहरी भागात आहे. शहरांमध्ये भाषेचा फारसा अभिमान राहिलाय अशी स्थिती नाही. नवी पिढी धाडसी आहे. नव्या दमाचे लेखक काही वेगळे आणि ताकदीचे लेखन घेऊन येताहेत. नवी पिढी वाचत नाही, हा गैरसमज आहे. विनोदी साहित्य कमी होतेय. ते लिहिणे आणि वाचणे अवघड आहे.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ' 'युवकांच्या साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मसापतर्फे प्रतिवर्षी युवा साहित्य-नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. प्रतिभेच्या नव्या कवडशांचा शोध घेणे हाच या संमेलनाचा हेतू आहे. विभागीय व समीक्षा संमेलने ग्रामीण भागात घेत आहोत. बालकुमार आणि युवकांच्यावर साहित्य, संस्कृती आणि वाचन चळवळ टिकविण्याची जबाबदारी आहे. तरुणपिढीचे भावनिक भरणपोषण करण्यासाठी संमेलने आवश्यक आहेत. ग्रामीण भागातील चांगल्या दर्जाचे साहित्यिक पुढे यावेत यासाठी साहित्यक्षेत्रात सकारात्मक दबावगट निर्माण झाले पाहिजेत,

विनोद कुलकर्णी म्हणाले, "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मसापचे प्रयत्न यशाच्या वाटेवर आहेत."


प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ग्रंथदिंडी निघाली. सुरवातीला अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सॉक्रेटिस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम हे पथनाट्य सादर केले. सोमनाथ सुतार व सहकाऱ्यांनी नांदी सादर केली. तिसऱ्या सत्रात भगवती क्रिएशन सांगली प्रस्तुत इरफान मुजावर लिखित आणि यशोधन गडकरी दिग्दर्शित 'तेरे मेरे सपने' या एकांकिकेचे सादरीकरण युवा कलाकारांनी केले. संमेलनाच्या समारोपापूर्वी प्रसिद्ध कवी रमजान मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित युवा कवींचे कवी संमेलन रंगले.

फोटोओळी : १, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या युवा साहित्य-नाट्य संमेलनाच्या उदघाटनापूर्वी सॉक्रेटिस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम हे पथनाट्य सादर करताना युवक.

२. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या युवा साहित्य-नाट्य संमेलनाच्या उदघाटनापूर्वी सोमनाथ सुतार व सहकाऱ्यांनी नांदी सादर करताना युवक.




Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page