१३२ वर्षं जुना गणिताचा दुर्मीळ ग्रंथ मसाप कडे सुपूर्द
१३२ वर्षं जुना गणिताचा दुर्मीळ ग्रंथ मसाप कडे सुपूर्द
रावजी मोरेश्वर देवकुळे यांचे 'तोंडच्या हिशेबांचे दुसरे पुस्तक' कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात दाखल


पुणे : सन १८८६ मध्ये गव्हर्नमेंट सेन्ट्रल बुक डेपो यांनी प्रकाशित केलेले रावजी मोरेश्वर देवकुळे यांचे 'तोंडच्या हिशेबांचे दुसरे पुस्तक' हा दुर्मीळ ग्रंथ लेखकाचे खापर पणतू आणि स प महाविद्यालयातील भूगोलाचे माजी प्राध्यापक अशोक मुकुंद देवकुळे यांनी मसापचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती २५००० प्रतीची काढल्याचा उल्लेख या पुस्तकात असून पुस्तकाची किंमत दीड आणा आहे. या पुस्तकात तीन प्रकरणे असून त्यात अवघड बेरजा, वजाबाक्या, गुणाकार आणि भागाकार पटापट तोंडी कसे करायचे हे सांगितले आहे. दुसरे प्रकरण गुणोत्तर व कसर यावर आहे. त्यामध्ये रुपयाचे १६ भाग केले असून एक आणा, दोन आणे(चवली), ४ आणे(पावली) आठ आणे(अथेली) अशा संज्ञा वापरल्या आहेत.लांबी, वजन,वेळ यांची परिमाणे दिली आहेत.तिसऱ्या प्रकरणात सरळ व्याज काढण्यासाठी अनेक चाली(पद्धती)दिल्या आहेत. या गोष्टी आता कालबाह्य झाल्या असल्यातरी १९व्या शतकात १३२ वर्षांपूर्वी अभ्यासक्रमात गणित कसे शिकवले जात होते याचा हा महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. हे पुस्तक ८० पानांचे असून ते इंग्रज सरकारने प्रसिद्ध केले आहे. त्या काळात महिन्याला साधारण ३०० आणे पगार होता, एक एकर जमिनीची किंमत १३५ रुपये होती, सोने २० रुपये तोळा होते, नारळ साडेसात रुपये शेकडा होते, एक रुपयाला दोन शेर तूप, दहा शेर तांदूळ, दीड तोळा केशर, साडेनऊ शेर गहू, ४ शेर बाजरी, साडेतीन शेर साखर मिळत असल्याचे स्पष्ट होते. प्रा. जोशी म्हणाले, 'हा दुर्मीळ ग्रंथ मसापच्या वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात जमा करण्यात आला असून त्याचे लवकरच डिजिटायझेशन करण्यात येईल त्यानंतर जिज्ञासूसाठी तो संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. आशावादी(लेखक श्रीधर व्यंकटेश केतकर प्रकाशन १९२७ किंमत दोन रुपये) महाराष्ट्र भाषाभ्यास (लेखक चिं. ग. कर्वे आणि य. रा. दाते प्रकाशन १९४०) रविकिरण मंडळातील प्रसिद्ध कवी श्रीधर रानडे आणि मनोरमाबाई रानडे यांचा श्री-मनोरमा हा कवितासंग्रह (प्रकाशन १९३९) ही पुस्तकेही प्रा. अशोक देवकुळे यांनी परिषदेच्या ग्रंथालयाला भेट दिली आहेत.'
चौकट
प्रा. अशोक देवकुळे यांचे वडील कै. मुकुंद सदाशिव देवकुळे हे स्वातंत्र्य सैनिक होते. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या कोश कार्यालयात ते कोशाचे काम करीत होते. हे कार्यालय बंद झाल्यानंतर ते य. गो. जोशी यांच्या सुलभ विश्वकोश या प्रकल्पात काम करीत होते. आपले वडील मुकुंद देवकुळे यांच्या संग्रहात ही दुर्मीळ पुस्तके होती. ती महाराष्ट्र साहित्य परिषदेला जतन करण्यासाठी देत आहे असे प्रा. अशोक देवकुळे यांनी सांगितले.