मसाप ब्लॉग  

माणसाच्या वागण्यातील सुसंगती आणि विसंगतीचा शोध कथा घेते : मृणालिनी चितळे महाराष्ट्र साहित्य परिषदेत

पुणे : जिग्सॉ पझल सोडवणं - कथा लिहणं म्हणजे माणसाच्या आयुष्यातील अनेक शक्यतांचा प्रवास साकार करणं असतं. वर्षानुवर्ष आपल्या मनात घर करून बसलेल्या माणसांना घर मिळवून देणं असतं. माणसाच्या वागण्यातील सुसंगती आणि विसंगती यांचा शोध घेणं असतं. असे मत प्रसिद्ध लेखिका मृणालिनी चितळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित 'काथसुंगंध' कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांच्या 'नातं' व 'शिंदबाजचा म्हातारा' या कथांचे अभिवाचन शुभांगी दामले व सौदामिनी साने यांनी केले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह वि. दा. पिंगळे उपस्थित होते. चितळे म्हणाल्या, 'माणसामाणसातील नातेसंबंधाविषयी माझ्या मनात अपार कुतूहल आहे. हे कुतूहल हेच माझ्या कथालेखनामागची प्रेरणा आहे. तसं पाहिलं तर आपल्या रोजच्या आयुष्यात खूप काही वेगळं घडत असतं, बिघडत असतं कुणाच्या तरी बोलण्यातील एखादं वाक्य, एखादा प्रसंग, वाचनात आलेलं एखादं विधान मनात रेंगाळत राहतं. आतआत रुतत जातं. कुठल्याकुठल्या संदर्भाचे धागे त्याला जोडले जातात. कधी त्यामध्ये कल्पनेचे रंग मिसळले जातात. अंतर्मनात काहीतरी वेगळं घडत असल्याचं जाणवतं. त्यातील उत्कट भाव अधिकाधिक गडद होत जातात, तेव्हा हातात लेखणी धरणं अपरिहार्य ठरतं. एकापुढे एक रचत गेलेले प्रसंग, त्यांना सांधत जाणारे नेणिवेच्या पातळीवरील दुवे कागदावर उतरवताना एखादं जिग्सॉ पझल जुळवत असल्याची अनुभूती येते. जिग्सॉ पझलला एक चौकट असते, पण हे अनुभूतीचं जिग्सॉ पझल मात्र वेस नसलेल्या गावासारखं कोणत्याही दिशेला पसरत जातं.

आपण सर्वजण काऊचिऊच्या गोष्टी ऐकत मोठे झालो त्यामुळे सगळ्यांना आवडणारा, आकर्षित करणारा असा हा साहित्यप्रकार आहे. दिसायला अतिशय सोपा, पण लिहिणाऱ्याच्या दृष्टीनं तेवढाच अवघड. कारण कथा यशस्वी होण्यासाठी फक्त ‘काय घडलं’ हे सांगणं पुरेसं नसतं तर ते ‘का’ घडलं याचा शोध घेणं अपेक्षित असतं. त्यासाठी आजूबाजूच्या घटनांमागचा कार्यकारणभाव समजून घेण्याची क्षमता असावी लागते आणि मानसिक आंदोलनं जाणून घेण्याची संवेदनशीलता ही असावी लागते म्हणूनच कथालेखन हे आव्हानात्मक ठरतं. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
 • Facebook Basic Square
 • Twitter Basic Square
 • YouTube Social Icon

© म.सा.प., पुणे 

Maharashtra Geet - Marathi
00:00 / 00:00
 • Facebook Social Icon
 • Twitter Social Icon
 • YouTube Social Icon

Total visitors: 

Website Designed & Developed By: 

एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक

यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ 

www.sahityasetu.org

सक्षम लेखक, सजग वाचक

 • Facebook Social Icon
 • Twitter Social Icon
 • YouTube Social Icon