‘मसापचा कै. रा. श्री. जोग पुरस्कार डॉ. वासुदेव मुलाटे याना जाहीर’

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, प्रख्यात समीक्षक कै. रा. श्री. जोग यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, एका समीक्षा ग्रंथाला, दरवर्षी एक विशेष मानाचा पुरस्कार दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी, ज्येष्ठ समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या 'बिंब प्रतिबिंब' या समीक्षा ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. ग्रंथाचे प्रकाशक म्हणून स्वरूप प्रकाशन,पुणेच्या राजश्री पांगारकर यांनाही हा पुरस्कार दिला जाणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. मनोहर जाधव, डॉ. तुकाराम रोंगटे आणि डॉ. वैजयंती चिपळूणकर यांच्या निवड समितीने या ग्रंथाची पुरस्कारासाठी निवड केली आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. निशिकांत मिरजकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांचीही उपस्थिती असणार आहे. हा समारंभ, शुक्रवार दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी, सायकांळी ६. ३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.