सुटीत मुलांना वाचतं करण्यासाठी आणि सर्जनशील बनविण्यासाठी 'मसापचा' पुढाकार
साहित्यिक राजीव तांबे घेणार पालकांची कार्यशाळा
पालकांना देणार शंभर नंबरी शंभर कल्पना

पुणे : शाळांना मोठी सुटी लागली की वेळ कसा घालवायचा हा प्रश्न जसा मुलांना पडतो, तसाच पालकांनाही या मुलांना कुठे गुंतवायचे हा प्रश्न अस्वस्थ करीत असतो.

शाळा सुरु असताना ज्या गोष्टी अजिबात करता येत नाहीत, त्याच मोकळेपणाने करण्यासाठी तर असते उन्हाळी सुटी. मुलांनी चुकांतून शिकता शिकता. नवनवीन गोष्टी अनुभवण्यासाठीच तर असते सुटी. विविध गोष्टी करत असताना आपला कल ओळखण्याची संधी सुटीतच मिळते.सुटी म्हणजे मस्त मजेत शिकण्यासाठीचा वेळ. मुलांच्या सुटीचं नियोजन मुलांनाच कसं करता येईल. मुलांना वाचतं आणि सर्जनशील कसं बनवता येईल यासाठी 'मसाप'ने पुढाकार घेऊन पालकांसाठी १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यशाळेचे आयोजन केले आहे. बालकुमारांसाठी लेखन करणाऱ्या संगीता पुराणिक यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यवाह माधव राजगुरू या उपक्रमाचे समन्वयक आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. राजीव तांबे पालकांना 'शून्य खर्चाच्या' शंभर १०० कल्पना सांगतील. आणि या सुटीत पालकांनी मुलांसोबत कसे शिकावे याचा कानमंत्र पण देतील.
१. ही कार्यशाळा पालकांसाठी असून ती विनामूल्य आहे.
२. कार्यशाळेसाठी नोंदणी आवश्यक असून पालकांनी आपले नाव व पत्ता ७३८५०२९८२५ या भ्रमणध्वनीवर एस. एम. एस. द्वारे किंवा masaparishad@gmail.com या पत्त्यावर इमेलद्वारे पाठवायचा आहे.
३. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश
४. पालकांनी कार्यशाळेला येताना वही पेन घेऊन यायचे आहे.
५. सहभागी पालकांना मुलांसाठीच्या शंबर वाचनीय पुस्तकांची यादी देण्यात येणार आहे. ही पुस्तके उपलब्ध करून देण्याची सुविधाही असणार आहे.
६. नाव नोंदणीची अंतिम तारीख १२ एप्रिल २०१८ रोजी सायं. ८. ०० वाजेपर्यंत राहील.