लेखकांना प्रकाशात आणणारे प्रकाशक मात्र अंधारात माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांची खंत

पुणे : "लेखकांना अनेक सन्मान मिळतात, त्यांची सर्वत्र दखल घेतली जाते. पण लेखकांना प्रकाशात आणणारे प्रकाशक मात्र अंधारातच राहतात." अशी खंत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र बनहट्टी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या कै. पुष्पा पुसाळकर पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. 'अंग देशातलं नवल' या ग्रंथमालिकेच्या उत्कृष्ठ ग्रंथनिर्मितीबद्दल हा पुरस्कार मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर याना बनहट्टी यांच्या हस्ते देण्यात आला, यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, प्रकाशक अरविंद पाटकर उपस्थित होते.
बनहट्टी म्हणाले, "प्रकाशक हा वाड्मयीन विश्वकर्मा आहे. प्रकाशक वाङ्मयीन विश्वाची उभारणी करतात. प्रकाशनासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींचे ते उत्तम संयोजन करतात. अशा प्रकाशकांकडे दुर्लक्ष करणे साहित्य विश्वाच्या हिताचे नाही. प्रकाशक वाचनसंस्कृतीचा मुख्य आधार आहेत." या समारंभात बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, "पुस्तक निर्मिती हा सामुहिक अविष्कार आहे. पुस्तक प्रकाशन-प्रक्रियेत लेखकाइतकेच मुद्रितशोधक, चित्रकार, बांधणीकार, छपाई करणारे यांचे योगदान महत्वाचे आहे. लेखक आणि वाचक यांच्यातला प्रकाशक हा दुवा आहे. प्रकाशकांविषयी साहित्य विश्वातील सर्वांनी कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे." सन्मानाला उत्तर देताना अरविंद पाटकर म्हणाले, "मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी म्हणून त्यांच्या हाती उपयुक्त साहित्य आकर्षक पद्धतीने देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. त्याला मुलांनी उदंड प्रतिसाद दिला. या उपक्रमाचे अनुकरण व्हावे. " या समारंभात ग्रंथनिर्मिती व्यवस्थापिका कै. पुष्पा पुसाळकर यांच्यावीषयी प्रीती बनहट्टी यांनी माहिती दिली. मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. समारंभाचे सूत्रसंचालन कार्यवाह बंडा जोशी यांनी केले. या समारंभाला कार्यवाह उद्धव कानडे, दीपक करंदीकर, डॉ. संदीप सांगळे, चैतन्य बनहट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.