'महाराष्ट्र साहित्य परिषदेने' केले ज्ञानकोशकार केतकरांना अभिवादन
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यकंटेश केतकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केतकरांच्या कमला नेहरू उद्यानातील स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण केला. या वेळी मसापचे कार्यवाह दीपक करंदीकर, लेखक शाम भुर्के, ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीचे वसंत जोशी, प्रकाश भोंडे, दिलीप जोशी उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, 'ज्ञानाधिष्ठीत समाजरचनेचे स्वप्न डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी पाहिले होते. त्यातूनच त्यांनी 'महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची' कल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणली. व्रतस्थ ज्ञानोपासकांच्या मांदियाळीतील केतकरांचे स्थान खूप वरचे आहे. केतकर उत्तम कादंबरीकार होते. त्यांच्या कादंबऱ्या तत्कालिन कादंबऱ्याहून खूप वेगळ्या होत्या. सामाजिक नीतीनियम आणि प्रतिष्ठेच्या रूढ कल्पना यांना हादरवून टाकणारे लेखन केतकरांनी नेहमीच केले. ते निरीश्वरवादी होते. राष्ट्रबल सवंर्धन होईल हाच धर्म आणि तीच नीती अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या सर्व विचारव्युहाला समाजशास्त्रीय पाया होता.
