वार्षिक पुरस्कारासाठी आवडलेली पुस्तके मसापला कळवा
मसापचे चोखंदळ वाचकांना आवाहन
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या वार्षिक वाड्मयीन पुरस्कारासाठी आवडलेली आणि १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेम्बर २०१७ या कालावधीत प्रसिद्ध झालेली विविध वाङ्मयप्रकारातली पुस्तके वाचकांनी २० एप्रिल पर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषदेला कळवावीत असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे. प्रा. जोशी म्हणाले, 'महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुरस्कार निवडीची प्रक्रिया अधिक पारदर्शी आणि सर्वसमावेशक व्हावी यासाठी वाचकांचाही सहभाग घेण्याचे ठरविले आहे. अनेक लेखक आणि प्रकाशकांच्या अनास्थेमुळे, पुरस्कारासाठीचे निवेदन वाचनात न आल्यामुळे, पुरस्कारासाठी परिषदेकडे पुस्तके पाठवली जात नाहीत. आलेल्या पुस्तकांचा विचार करून नेमलेले परीक्षक पुरस्कारयोग्य ग्रंथाची निवड करतात. वाचकांनी त्यांच्या पसंतीची पुस्तके कळविल्यास त्या पुस्तकांचाही विचार करता येईल. त्यामुळे त्या वाङ्मय प्रकारातील सर्व चांगली पुस्तके विचारात घेतली जातील. हा या मागचा उद्देश आहे. वाचकांनी आवडलेली पुस्तके लेखकाचे नाव, साहित्यप्रकार आणि प्रकाशन संस्थेच्या नावासह पत्राद्वारे किंवा masaparishad@gmail.com या पत्त्यावर इमेलद्वारे कळवावे. चौकट : खालील वाड्मप्रकारासाठी पुस्तके सुचवा कथासंग्रह, कादंबरी, नाट्यविषयक, इतिहासविषयक, ललितेतर वैचारिक, सामाजिकशाश्त्रे, शिक्षणविषयक, उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती, आत्मचरित्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, स्त्रीजीवनविषयक, उत्कृष्ट वाङ्मयमूल्य असलेला ग्रंथ, सामाजिक आशय, उत्कृष्ट बालवाङ्मय, पौराणिक तसेच रामायण, महाभारताशी संबंधित ग्रंथ लक्षवेधी साहित्यग्रंथ, प्रबंध लेखन, स्तंभलेखन, आहार-आरोग्याशी संबंधित पुस्तके, ललित गद्य, संपादित ग्रंथ, बँकिंग क्षेत्रातील पुस्तके, संतवाड्मयविषयक पुस्तके, औषधनिर्माणशाश्त्र, किंवा वैद्यक विषयांशी निगडित पुस्तकं.