साधनेशिवाय कलाकार घडत नाही : कीर्ती शिलेदार


पुणे : नाट्य संगीतावर प्रादेशिकतेचा शिक्का अकारण मारला जातो. भारतीय पातळीवर नाव मिळवायचे असेल तर नाट्यसंगीत गायचे नाही आणि जागतिक पातळीवर नाव कमवायचे असेल तर शास्त्रीय संगीत गायचे नाही. अशी मानसिकता आज तयार केली जाते आहे. त्याला तरुण पिढी बळी पडते आहे. झटपट प्रसिद्धी, लाखांची बिदागी आणि गर्दीचे आकर्षण यामुळे कलाकार साधना सोडून त्यातच रमतात. साधनेशिवाय कलाकार घडत नाही. असे मत संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मसाप गप्पा कार्यक्रमात संगीत रंगभूमीचे अभ्यासक आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखोळकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. या मुलाखतीतून शिलेदार यांचा संगीत रंगभूमीवरचा पन्नास वर्षाचा प्रवास उलगडला या मुलाखतीची सांगताहोत असताना अखिल भारतीय नाट्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी आली. परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलाखत संपताच ती शिलेदार याना सांगितली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते शिलेदार यांचा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पहिला सत्कार परिषदेतर्फे करण्यात आला. या अनपेक्षित सुखद बातमीने आणि सत्काराने शिलेदार भारावल्या. शिलेदार म्हणाल्या, आईच्या पोटात असल्यापासून माझ्यावर नाट्यसंगीताचे संस्कार झाले. त्यामुळे नाट्यसंगीत रक्तातून वाहते आहे समोर बसून आई वडिलांनी काही शिकवले नाही त्यांच्याकडे पहात शिकलो वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर प्रवेश केला बालवयात बालगंधर्व, कन्हैयालाल, ग. त्र्यं. माडखोलकर, कॉम्रेड डांगे, कुसुमाग्रज, पु भा भावे, आचार्य अत्रे, ना सी फडके, गंगुबाई हनगल, मोगुबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकर या दिगगजांची दाद मिळाली.त्यामुळे उत्साह वाढला संगीत रंगभूमीचा तो सुवर्णकाळ होता आता करमणुकीचा महापूर आला आहे त्यात अभिजात रसिकता वाहून चालली आहे याची खंत वाटते. कार्यवाह प्रमोद आडकर यावेळी उपस्थित होते. वि दा पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले