आशय समजून केलेले मुद्रितशोधन जास्त महत्वाचे : डॉ. सरोजा भाटे

पुस्तकदिनाच्या निमित्ताने साहित्य परिषदेत मुद्रितशोधकांचा सन्मान पुणे : ऱहस्व, दीर्घ, वेलांटी यांचा विचार म्हणजे मुद्रितशोधन नव्हे. आशय समजून केलेले मुद्रितशोधन जास्त महत्त्वाचे आहे असे मत संस्कृतच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सरोजा भाटे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुस्तकदिनाच्या निमित्ताने पुस्तक निर्मितीत मोलाचे योगदान देणारे गोपाळकृष्ण कुलकर्णी, विजय सरदेशपांडे, मिलिंद बोरकर, रमेश भंडारी, विजय जोशी, जयश्री हुल्याळकर, प्रा. गिरीश झांबरे, अनुश्री भागवत, आरती घारे, प्रा. रुपाली अवचरे, उल्का पासलकर, नरेंद्र आढाव, विशाखा धायगुडे, राजेंद्र पुरोहीत, मोरेश्वर ब्रम्हे आणि प्रदीप गांधलीकर या प्रातिनिधिक मुद्रितशोधकांचा सन्मान भाटे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते.
भाटे म्हणाल्या, अर्थाच्या खिडकीतून शब्दांकडे जाणे सोपे जाते. शब्द आणि अर्थ यांच्यातली संपृक्तता जास्त महत्वाची आहे. लेखक आणि वाचक यांच्यातला दुवा म्हणून मुद्रितशोधक काम करीत असतात. त्यांच्या महत्वपूर्ण कामां
कडे दुर्लक्ष होत आहे याची खंत वाटली पाहिजे. जोशी म्हणाले, 'मुद्रितशोधन ही एक कला आहे. ती विकसित करण्यासाठीही साधना करावी लागते. मुद्रितशोधनाच्या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. भाषेच्या विद्यार्थ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पहिले पाहिजे. काही वर्षांपूर्वी लेखक स्वतः मुद्रितशोधकांकडे जाऊन संवाद साधून पुस्तक दोषरहित व्हावे यासाठी प्रयत्न करत. आज हे चित्र दिसत नाही. पुस्तकदिन साजरा होत असताना समाजाची कमी होत चाललेली ग्रंथाभिमुखता चिंतेची बाब आहे. मुद्रितशोधकांचे पुस्तक निर्मितीतले स्थान महत्वाचे असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात होते मात्र साहित्य परिषदेने मुद्रितशोधकांची दखल घेतली याचे समाधान आहे अशी भावना सन्मानार्थीनी व्यक्त केली. कार्यवाह माधव राजगुरू उपस्थित होते. कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले.