नावीन्याच्या शोधातून जगणे अधिक परिपूर्ण
मसापतर्फे डॉ. वसंतराव पटवर्धन यांचा विशेष सत्कार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. वसंतराव पटवर्धन यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.या वेळी कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीता पवार उपस्थित होत्या. सिम्बायोसिसचे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला.बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्लार्क ते अध्यक्षपदाची सूत्रे या प्रवासातील अनेक अनुभव, विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्तींच्या भेटीतून घेतलेली प्रेरणा, सतत नावीन्याच्या शोधात राहण्यासाठी लेखनातून मिळालेल्या ऊर्जेचे किस्से गप्पांमधून उलगडत गेले अन् नकळत नव्वद वर्षे वयाच्या डॉ. वसंतराव पटवर्धन या उत्साही तरुणाने उपस्थितांना जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक विचार दिला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुधीर गाडगीळ यांनी डॉ. पटवर्धन यांची मुलाखत घेतली. सहज सोप्या गप्पांमधून, आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आलेल्या अनुभवकथनातून ही मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली.
बँकेत रुजू झाल्यापासून ते तेथे राबविलेल्या विविध योजना, नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती पटवर्धन यांनी दिली. बँकेच्या विस्तारीकरणादरम्यान माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, यशंवतराव चव्हाण यांसह विविध राजकीय, उद्योजक मंडळींबरोबर आलेले अनुभव त्यांनी ओघवत्या शैलीत सांगितले. अर्थकारण, सामाजिक, ललित लेखनाचे दाखलेही त्यांनी दिले. बँकेतील जबाबदाऱ्या चोख पार पाडताना केलेली तारेवरची कसरत, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये तडजोड न करण्याची वृत्ती, सतत नावीन्याच्या शोधात राहून जगणे अधिकाधिक परिपूर्ण करण्याची धडपड पटवर्धन यांच्या बोलण्यातून जाणवत होती. वयाच्या नव्वदीतही त्यांच्या बोलण्यातील उत्साहाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
मुजुमदार म्हणाले, 'पटवर्धन केवळ बँकर नसून ते उत्तम लघुकथा लेखक, कवी, कादंबरीकार असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आहे. आयुष्याला लांबी बरोबरच खोली असावी लागते, ही खोली पटवर्धन यांनी प्राप्त केली आहे.' जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे यांनी केले.