रसिकांच्या आनंदासाठी हास्यकविता : बंडा जोशी, स्वाती सुरंगळीकर
रंगली 'एक कवयित्री एक कवी' मैफल नवी

पुणे : आजच्या संघर्षमय जीवनात माणसं निर्मळ आनंदापासून दूर गेली आहेत. रोजच्या जगण्यातले ताणतणाव वाढत चालले आहेत. माणूस एकाकी होत आहे. मनातल्या आनंदाचा कोपरा रिकामा होत आहे. अशावेळी विनोद आणि हास्य फारच महत्वाचे आहे. रसिकांना हा आनंद देण्यासाठी आम्ही हास्यकविता, एकपात्री, विडंबन विनोदातून लोकांचे मनोरंजन करतो. रसिकांच्या आनंदासाठीच आम्ही हास्यकविता लिहितो. असे मत हास्यकवी बंडा जोशी आणि स्वाती सुरंगळीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एक कवयित्री एक कवी या कार्यक्रमात प्रसिद्ध हास्यकवी बंडा जोशी आणि प्रसिद्ध हास्यकवयित्री स्वाती सुरंगळीकर सहभागीझाले होते. त्यांच्याशी कवी उद्धव कानडे आणि प्रमोद आडकर यांनी संवाद साधला. यावेळी मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होत्या. बंडा जोशी म्हणाले, 'स्त्रियांना विनोदबुद्धी नसते हा गैरसमज पुरुषांनी पसरवला आहे. शब्दांच्या कोट्या करणे म्हणजेच विनोदी कविता नसते. उपहास, उपरोध, विडंबन, परिहास ही विनोदमूल्य स्वभावनिष्ठ, शब्दनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ असावी लागतात. यासाठी हास्याची बाराखडी अभ्यासली पाहिजे. विनोदी साहित्याची परंपरा आम्ही मानतो. विसंगती हाच विनोदी साहित्याचा प्राण आहे. यावेळी दोघांनीही सादर केलेल्या हास्यकवितेने रसिक मंत्रमुग्ध तर झालेच पण हशा आणि टाळ्यांच्या गजरात रसिकांनी हास्याचा आनंद लुटला. रसिकांनी प्रचंड गर्दी केलेला हा कार्यक्रम रसिकांना हास्यानंद देऊन गेला. उद्धव कानडे यांनी विचारलेल्या रॅपिड फायर प्रश्नांना हसत खेळत उत्तरे देऊन कवींनी मैफलीची रंगत वाढवली. 'संसारी लोणचं' आणि 'बाळाचा पाळणा' या कवितांनी सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले. सैराट या मराठी चित्रपटातील झिंगाट या गाण्याचे बंडा जोशी यांनी विडंबन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कवी उद्धव कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर प्रमोद आडकर यांनी आभार मानले.
