डॉ. प्रभाकर मांडे यांना 'मसाप जीवनगौरव' आणि राजा शिरगुप्पे यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता
२७ मेला होणार वितरण पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा 'मसाप जीवनगौरव पुरस्कार लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांना जाहीर झाला आहे. वाङमयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार विद्रोही साहित्य चळवळीचे अध्वर्यू आणि सीमाभागातील कार्यकर्ते लेखक प्रा. राजा शिरगुप्पे यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. २७ मे रोजी परिषदेच्या ११२ व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती आणि ज्येष्ठ मूर्तिशास्त्र तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे यावेळी उपस्थित होते. प्रा. जोशी म्हणाले, 'दुर्गा भागवत यांच्यानंतर लोकसाहित्याच्या व लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली त्यांच्यापैकी डॉ. प्रभाकर मांडे हे महत्त्वाचे संशोधक आहेत. पाच दशकाहून अधिक काळ लोकसाहित्य व संस्कृतीचा व्रतस्थ वृत्तीने अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या डॉ. मांडेंनी लोकसंस्कृतीच्या विविध अंगांचा विस्तारपूर्वक शोध घेतला. लोकरंगभूमीपासून ते सांकेतिक आणि गुप्त भाषांपर्यंत सर्व विद्यांचे शोधपूर्वक दर्शन घडवून, अनेक मौलिक ग्रंथ सिद्ध करून त्यांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. डॉ. मांडेंनी लोकसाहित्य परिषदेची स्थापना करून लोकसाहित्याच्या अभ्यासकांना प्रोत्साहन दिले. लोकसाहित्य आणि संस्कृतीच्या संशोधनासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना 'मसाप जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करताना परिषदेला आनंद व समाधान वाटत आहे. कसदार लेखन करताना महाराष्ट्रातील साहित्यासह सर्व चळवळींना वैचारिक अधिष्ठान देणारे लेखक-कार्यकर्ता आणि विद्रोही साहित्य चळवळीचे अध्वर्यू म्हणून प्रा. राजा शिरगुप्पे महाराष्ट्राला परिचित आहेत. सीमा भागातील मराठी बांधवांच्या संवेदनांशी एकरूप होऊन त्यांचे मनोबल वाढविणारा कार्यकर्ता म्हणून शिरगुप्पे यांची वेगळी ओळख आहे. लेखक- कार्यकर्ता या नात्याने वाङ्मयीन चळवळीत दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल परिषदेच्या डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कराने सन्मानित करताना परिषदेला आनंद वाटत आहे.
पिंपरी-चिंचवड शाखेला उत्कृष्ट मसाप शाखा पुरस्कार
रवींद्र बेडकिहाळ, गिरीश दुनाखे यांना 'मसाप कार्यकर्ता' पुरस्कार
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी वर्धापनदिन समारंभात राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक देण्यात येतो. या करंडकाचे या वर्षीचे मानकरी आहेत मसापची पिंपरी-चिंचवड शाखा. तसेच रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता पुरस्कार रवींद्र बेडकिहाळ (फलटण) आणि गिरीश दुनाखे(सोलापूर) यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार २७ मे २०१८ रोजी होणाऱ्या वर्धापनदिन समारंभात डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती आणि ज्येष्ठ मूर्तिशास्त्र तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहबे कसबे समारंभाच्या अध्यक्षस्थानी आहेत. हा समारंभ सायं. ६. ०० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.



