top of page

मसाप ब्लॉग  

२६ आणि २७ मे रोजी 'मसाप' चा ११२ वा वर्धापनदिन

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित लेखिका प्रतिभा राय यांच्या हस्ते होणार ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कारांचे वितरण


पुणे : महाराष्ट्रातील साहित्य संस्थांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११२ वा वर्धापनदिन समारंभ २६ आणि २७ मे रोजी साजरा होणार आहे. २६ मे रोजी सायं ६ वाजता ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कराचे वितरण ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित उडिया भाषेतील प्रसिद्ध लेखिका प्रतिभा राय यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा समारंभ साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. मसापच्या वर्धापनदिन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून अन्य भाषेतील ज्येष्ठ साहित्यिकाला निमंत्रित करण्यास मसापने गेल्यावर्षीपासून प्रारंभ केला. ज्येष्ठ कन्नड लेखिका वैदेही गेल्या वर्षीच्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या असे प्रा. जोशी यांनी सांगितले.

प्रतिभा राय यांचा परिचय : प्रतिभा राय या भारतीय साहित्यातील एक नामवंत लेखिका आणि उडिया साहित्यातील सर्वांत महत्त्वाच्या लेखिका आहेत. त्यांचे लेखन विपुल प्रमाणात आहे व ते लोकप्रियही आहे. कादंबरी व लघुकथा या दोन्ही साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलेले असले, तरीही त्या कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कादंबऱ्या एकोणीसशे सत्तरच्या दशकात प्रसिद्ध होऊ लागल्या, एकोणीसशे ऐशीच्या दशकात त्या एक प्रमुख भारतीय लेखिका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या होत्या, त्यांना मूर्तिदेवी पुरस्कार त्यांच्या सर्वांत गाजलेल्या 'याज्ञसेनी' या कादंबरीसाठी दिला गेला. तसेच त्यांच्या 'उल्लंघन' लघुकथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. २०११ मध्ये त्यांना भारतीय साहित्यातील त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्यांमध्ये 'वर्षा बसंत बैसाख' (वर्षा ऋतू, वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू), 'पुण्यतोय' (पवित्र), 'आसावरी, 'नीलतृष्णा' (निळी तृषा), 'सिलापदम' (दगडी कमळ), 'उत्तरमार्ग' (शेवटानंतरचा मार्ग), 'आदिभूमी', (सर्वांत पहिली जमीन), 'महामोह' (सर्वात मोठा मोह), 'मग्नमाती', (जमिनीखालील पृथ्वी) व 'महाराणी पुत्र' (महाराणीचा पुत्र), यांचा समावेश करावा लागेल. त्यांच्या काही सुप्रसिद्ध कथासंग्रहांमध्ये 'सामान्यकथन' (सामान्य बोलणे), 'एकताना' (सुमधुर स्वर), 'गंगा सिलूली' (सिलूलीचे फुल), 'घास ओ आकास' (गवत आणि आकाश), 'अब्यक्त' (अव्यक्त), 'पृथक् इस्वर' (वेगळा ईश्वर), 'भागबानरा देस' (भागबानचा देश), 'मोख्य' (मोक्ष), 'उल्लंघन' (उल्लंघन), आणि 'गांधारा गाम' (गांधींचे खेडे) यांचा उल्लेख करावा लागेल.


Featured Posts
Recent Posts
Archive