आपल्याकडे सांस्कृतिक अभिज्ञता नाही : डॉ. अरुणा ढेरे
साहित्य परिषदेने राजेंद्र बनहट्टी गौरव व्याख्यानमाला
पुणे : आज आपण स्त्री आणि सृष्टी या दोघींवरही अत्याचार करीत आहोत. आपल्याकडे संस्कृतीकडे पाहण्याचा, परंपरा नीट समजून घेण्याचा कोणताही निरोगी दृष्टीकोन नाही. जशी आपल्याकडे ऐतिहासिक अभिज्ञता नाही, तशी सांस्कृतिक अभिज्ञताही नाही. असे मत ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या राजेंद्र बनहट्टी गौरव व्याख्यानमालेत 'सृष्टी आणि स्त्री' या विषयावर त्या बोलत होत्या. व्यासपीठावर परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होते.

डॉ. ढेरे म्हणाल्या, ' प्राचीन भारतीयांनी सगळ्या सृष्टीलाच देवता स्वरूप मानलं होतं. त्यांनी सृष्टीकडे कधीच उपभोग्य वस्तू म्हणून पाहिलं नाही. उलट संपूर्ण सृष्टी ही आदिमातेच्या रूपातच त्यांनी पहिली आणि पुजलीही. मुळात देवपूजेची संकल्पना ही सृष्टीपूजेतूनच उत्क्रांत होत गेली आहे. आर्यपूर्व समाजात सृष्टिपूजेच्या ज्या ज्या धारणा होत्या आणि त्या अनुकूल अशा ज्या प्रथा परंपरा होत्या, त्याची मिसळण आर्यांच्या आगमनानंतर आर्य धारणा मधेही झाली. त्या धारणा निसर्गाशी-सृष्टीशी एकरूप असण्याच्या माणसांच्या मानसिकतेतून आल्या होत्या. त्यांनी स्त्री आणि सृष्टी एकरूप मानली. दोहींमध्ये सृजनाचं एकच तत्व आहे हे त्यांच्या लक्षात आलं. सृष्टीप्रमाणेच स्त्रीही जीवांना जन्म देते, वाढवते पोसते. सृष्टीचं हे तत्व भूमीत आहे, नद्यांमध्येही आहे. म्हणून भूमी, नदी आणि स्त्री या भारतीय परंपरेत एकच आहेत खरे तर ही धारणा वैश्विक आहे.
विज्ञाननिष्ठ म्हणवताना आज आपण माणसाचं वर्षानुवर्ष जगण्यातून आलेलं शहाणपण दूर सारलं आहे. धर्म, संस्कृती आणि स्त्री या तिन्हींच्याही बाबतीत आपण भ्रमिष्ट झाले आहोत आणि तीनही बाबतीतले भ्रम संकुचित दृष्टीच्या आग्रही सनातनी माणसांनी जसे निर्माण केले आहेत तसे श्रद्धेची दुकानं मांडणाऱ्या बाबा आणि बुवांनी निर्माण केले आहेत आणि स्वार्थासाठी सामाजहितैषी विचार दूर सारणाऱ्या, मतांचा बाजार करणाऱ्या राजकारण्यांनी निर्माण केले आहेत. त्यामुळे स्त्री कमालीची असुरक्षित झाली आहे आणि सृष्टी-पर्यावरण तर आपण ओरबाडून नष्ट करत चाललो आहोत. या पार्श्वभूमीवर जैववैविध्य टिकविण्याचा आणि सृष्टीबरोबर स्त्रीचा आदर करण्याची दृष्टी जोपासली पाहिजे. संहारकेंद्री झालेल्या जगाला सर्जनकेंद्री बनवण्यासाठी हे आता आपले दायित्व आहे. प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्तविक केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.