संस्कृत वाङ्मयाचा परिचय सोप्या भाषेत करून द्यावा : पं. वसंतराव गाडगीळ
पुणे : संस्कृत भाषेतले वेद आणि वाड्मय हा मानवाला मिळालेला समृद्ध वारसा आहे आणि तो केवळ घोकंपट्टी करून पाठ करण्यापेक्षा सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत न्यायला हवा. असे मत ज्येष्ठ संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, संशोधनात्मक लेखनासाठी असलेल्या 'कै. कृष्ण मुकुंद (उजळंबकर) स्मृती पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार 'सामवेदी बोली-संरचना आणि स्वरूप' या ग्रंथासाठी विरारचे डॉ. नरेश नाईक याना प्रदान करण्यात आला. रु. १०,०००/-, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्कारासाठी प्राचार्य दिलीप शेठ आणि अभिजित घोरपडे यांच्या ग्रंथनिवड समितीने या ग्रंथाची निवड केली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे, दीपक करंदीकर, कै. कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या कन्या नलिनी गुजराथी, सुधीर उजळंबकर जामात मोहन गुजराथी आणि कुटुंबीय उपस्थित होते.

पं. गाडगीळ म्हणाले, 'थोर लोकोत्तर व्यक्तींचे केवळ पुण्यस्मरण न करता त्यांच्या कार्याचे अनुकरण करणे अधिक महत्वाचे आहे.'
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ' कै. कृष्ण मुकुंद उजळंबकर हे ग्रंथसेवेचे प्रयागतीर्थ होते. वैदिक वाङ्मयाचा अभिमान बाळगून त्याचा अभ्यासपूर्ण प्रचार-प्रसार व्हायला हवा आपली भाषा-बोली यांचं प्रेम आटत चाललं आहे आणि परभाषेचा वृथाभिमान वाढतो आहे. ही बाब संस्कृतीला मारक आहे.'
डॉ. नरेश नाईक म्हणाले, 'उत्तर वसईमध्ये ८ कि. मी. च्या परिवारात ही सामवेदी बोली सुमारे एक लाख लोक बोलतात. या भाषेला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. अशा बोलीभाषांचा संरचनेच्या दृष्टीने अभ्यास करणे आणि त्यांचा सांस्कृतिक संदर्भ समजून घेणं गरजेचं आहे.' डॉ. नलिनी गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.